जामखेड : रोहित पवार समर्थकाकडून भाजपचे सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे यांना मारहाण, जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राष्ट्रवादी विरूध्द भाजप हा संघर्ष शिगेला पोहचला आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.अश्यातच भाजपचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रसिध्दी प्रमुख असलेल्या उध्दव हुलगुंडे यांना रोहित पवार समर्थकाने मारहाण केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणूकीच्या तोंडावर रोहित पवार समर्थकांचा तोल ढासळू लागल्याचे या घटनेवरून अधोरेखित होऊ लागले आहे.

Jamkhed, Rohit Pawar supporter assaulted BJP social media chief Uddhav Hulgunde, case registered at Jamkhed police station,

याबाबत सविस्तर असे की, ‘तु रोहित दादा पवार यांच्या विरुध्द सातत्याने सोशल मिडीयावर पोस्ट का टाकत आहेस?’ असे म्हणत जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील सागर गवसने त्याच्या एका साथीदाराने भाजपा सोशल मिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे यांना जामखेड शहरात मारहाण केली. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बीड रोड येथील पुजा साडी सेंटर दुकानासमोर घडली. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला दोघा जणांविरोधात भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस) २०२३ कलम ३०९ (६) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चुंबळी येथील उध्दव आश्रू हुलगुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

भाजपा सोशल मिडीया प्रमुख उध्दव हुलगुंडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २९ ऑगस्ट रोजी जामखेड येथे आमदार प्रा राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसलेलो असताना ९०९६२४८३०२ या मोबाईल नंबरवरुन मला फोन आला असता, तो फोन मी उचलल्यानंतर समोरुन “मी सागर गवसने बोलतोय परवा जामखेडमध्ये काय धिंगाणा होतोय ते पाहत राहा” असे बोलून त्याने फोन कट केला.

३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मी भाजी मंडई येथून भाजीपाला खरेदी करून भाजीपाल्याची पिशवी मोटारसायकलला लटकवत असताना पाठीमागून दादा राळेभात याने मला पाठामागून कवळ मारली. त्याचवेळी सागर गवसने हा समोरून आला. त्याने माझ्या शर्टच्या वरील खिशात हात घालून बळजबरीने माझा मोबाईल व तीन हजार रुपये काढून घेतले. तीन दिवसांपूर्वी फोन करुन तुला सांगितला होते तरीसुध्दा तु रोहित दादा पवार यांच्याविरुध्द सोशल मिडीयावर पोस्ट का टाकत आहेस?” असे म्हणत त्याने मारहाण केली.

माझा मोबाईल त्याकडून परत घेण्यासाठी माझी त्याच्याशी झटापट सुरु असताना सागर गवसने यांने मला धमकी दिली की, “परत आगावपणा केला तर तुला जिवंत ठेवणार नाही” असे म्हणून तो तेथून पळून गेला. ही घटना बीड रोड परिसरातील पुजा साडी सेंटर दुकानासमोर घडली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांत जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस आरोपींविरुध्द काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपा सोशल मीडिया प्रमुख उध्दव हुलगुंडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जामखेड व कर्जत तालुका भाजपकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. भाजपा सोशल मिडीया प्रमुखावर विरोधी गटातील कार्यकर्त्याने हल्ला केल्यामुळे भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.