जामखेड टाइम्स वृत्तसेवा । दोन दिवसांपूर्वी जामखेड शहरातील विठाई मंगल कार्यालय परिसरातून मोटारसायकल चोरीस जाण्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या जामखेड पोलिसांच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. अवघ्या दोन दिवसांत जामखेड पोलिसांनी सदर मोटारसायकल चोरीचा तपास लावला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून मुद्देमालासह मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरोपीला जामखेड न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड – कर्जत रोडवरील विठाई मंगल कार्यालय परिसरातून 28 फेब्रुवारी 2023 रोजी भरदिवसा काळ्या रंगाची होंडा शाईन (MH 16 CN 0209) ही मोटारसायकल चोरीस गेली होती. याप्रकरणी अविनाश शिवमुर्ती पवार (वय 36 वर्ष) धंदा दुकानदार राहणार गोडाऊन गल्ली यांनी फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणाचा तपास पोलिस नाईक अजय साठे यांच्याकडे देण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अजय साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर गुन्ह्याचा वेगाने तपास हाती घेतला होता. अवघ्या दोन दिवसांत या गुन्ह्यातील आरोपी तुकाराम लक्ष्मण पवार रा.चिंचोली ता.कळमनुरी जि.हिंगोली यास मुद्देमालासह अटक करण्याची कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली आहे.
सदर आरोपीस जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.