जामखेड : विसापुर कारागृहातून पळालेल्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या, जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गुन्हेगारांचे कर्दनकाळ अशी ख्याती असलेले, धडाकेबाज कारवाया करून गेल्या दोन वर्षांपासून जामखेड तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणारे जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आणखीन एक धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे. विसापुर कारागृहातून फरार झालेल्या आरोपीस बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे. ही कारवाई सावरगाव परिसरात करण्यात आली. या कारवाईमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
सन 2010 साली जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे एका महिलेच्या खुनाची घटना घडली होती. या प्रकरणात जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं.२६१/२०१० भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता. तत्कालीन दिवंगत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्या टीमने गुन्ह्याचा तातडीने छडा लावत विजय गहिनीनाथ चव्हाण या मुख्य आरोपीला अटक केली होती. त्याच्याविरोधात न्यायालयात सबळ पुराव्यांसह आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. जिल्हा व सत्र न्यायालय, अहमदनगर न्यायालयात झालेल्या सुनावणीत विजय गहिनीनाथ चव्हाण हा दोषी आढळला होता. सन २०१२ मध्ये त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
2012 पासून विजय गहिनीनाथ चव्हाण हा आरोपी विसापुर जिल्हा खुले कारागृह येथे शिक्षा भोगत होता. मात्र शिक्षा भोगत असताना एक वर्षापुर्वी तो कारागृहातून फरार झाला होता. त्या बाबत त्याचे विरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 224 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तो मिळून येत नव्हता. मात्र विजय गहिनीनाथ चव्हाण हा फरार आरोपी अधुन-मधुन जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे येत असल्याची कुणकुण जामखेड पोलिसांना लागली होती. गेल्या तीन महिन्यांपासून जामखेड पोलिसांनी विजय गहिनीनाथ चव्हाणच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती.
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे व पोलीस काॅन्स्टेबल सचिन पिरगळ हे विजय गहिनीनाथ चव्हाणवर पाळत ठेवून होते. परंतु तो पोलिसांना नेहमी गुंगारा द्यायचा, परंतू चव्हाण याला कसल्याही परिस्थितीत बेड्या ठोकायच्याच या इराद्याने जामखेड पोलीसांनी लावलेल्या जाळ्यात विजय चव्हाण हा अलगद अडकला.
दि 4 रोजी जामखेड पोलिसांनी सावरगाव येथून विजय गहिनीनाथ चव्हाण याच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली.ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. सदरच्या आरोपीस पुन्हा कारागृहात दाखल करण्याकामी रवाना करण्यात आले आहे.
कारवाईच्या पथकात पोलीस हेडकॉन्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश जाधव, सचिन पिरगळ व चालक पोलीस हेडकॉन्टेबल भगवान पालवे यांचा समावेश होता.