मोठी बातमी : काळ्या बाजारात विक्रीस जाणारा अडीच लाखांचा तांदूळ जामखेडमध्ये पकडला, ट्रकसह मुद्देमाल जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । अहमदनगर, राहुरीमध्ये रेशनिंगचे धान्य पकडण्याची घटना ताजी असतानाच, आता जामखेडमधून तांदूळ पकडल्याची मोठी घटना उघडकीस आली आहे. या कारवाईत काळ्या बाजारात विक्री जाणारा सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा 14990 किलो तांदूळ पकडण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट येथून अहमदनगरच्या दिशेने तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पकडण्याची धडाकेबाज कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली. ही कारवाई 24 नोव्हेंबर 2022 रोजी जामखेड- अहमदनगर रोडवरील हिमालय पेट्रोलपंपानजीक रात्री करण्यात आली.
याबाबत पोलिस काँस्टेबल अरूण पवार यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, 24/11/2022 रोजी रात्री 10/30 वाजेच्या सुमारास मी व पोलिस हेड काँस्टेबल संजय लोखंडे, पोलीस काँस्टेबल संदिप राऊत,संदिप आजबे,अनुराधा घोगरे यांच्यासह जामखेड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग कामी गस्त करीत असताना आम्हाला एक मालट्रक संशयितरित्या नगर रोडच्या दिशेने जात असताना दिसला.
चालकास हात दाखवुन गाडी थांबवण्याचा इशारा केला असता त्याने गाडी रस्त्याच्या बाजुला घेतली. आम्ही सदर ट्रक हिमालय पेट्रोलपंप नगर रोड जामखेड येथे थांबवला. तेव्हा चालकास नाव गाव विचारले असता चालकाने त्याचे नाव- शिवाजी बबन गफाट, वय 37 वर्षे, रा. इंदापुर ता. वाशी, जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले. तसेच गाडीचा नंबर पाहता ट्रक क्र एम.एच.15 सी.के.0191 असा दिसुन आला.
चालकास वाहनात पाठीमागे काय आहे असे विचारले असताता त्याने सदर ट्रकमध्ये एकुण 210 तांदळाच्या गोण्या असल्याचे कळविले. तेव्हा त्यास सदर तांदळाची पावती आहे का ? असे विचारले असता, त्याने सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने के. बी वाघवकर वेट ब्रीज येथील पावती क्रमांक 4914 ही पावती दाखवली. ज्यात गाडीसह एकुण वजन 22450 किलो. त्यात गाडीचे वजन 7460 किलो व मालाचे वजन 14990 किलो असल्याचे दिसुन आले.
सदरचा माल कोणाचा आहे व कोठे पोहच करणार याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल अमर वसंत लवटे वय-31 वर्षे धंदा व्यापार, रा. ईट ता. भुम.जि. उस्मानाबाद यांच्या आडत दुकानातुन भरलेला असुन तो सुपा येथील कंपनीत घेवुन जात असल्याचे सांगितले. सदरील ट्रकमधील तांदुळ पांढ-या रंगाच्या गोणीत असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले. सदरचा तांदुळ जिवनावश्यक वस्तु अधिनियम मधील सार्वजिनक वितरणाचा असल्याबाबत संशय असल्याने तो ट्रक तांदुळासह पोलिसांनी ताब्यात घेतला.
सदर चालकाकडे जामखेड पोलिसांनी कसून चौकशी केली त्याने सांगितले की, हा तांदुळ केडगाव अहमदनगर येथे घेवुन जात आहे. सदर मालाबाबत माझ्याकडे कोणत्याही पावत्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे यांनी तात्काळ दोन पंचांना जामखेड पोलीस स्टेशनला बोलावून घेत सदर ट्रक व तांदुळ याची पाहणी करुन तो मुद्देमाल जप्त केला. यामध्ये आठ लाख रूपये किमतींचा मालट्रक (एम.एच.15 सी. के. 0191) तसेच अडीच लाख रूपये किमतीचा 14990 किलो 210 गोणी तांदुळ असा साडे दहा लाख रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वरील मालाच्या खरेदी विषयी चालकाने कोणत्याही पावत्या सादर केल्या नाहीत, सदरचा माल हा मालकाने कोठुन तरी चोरीने मिळवून अथवा खरेदी करुन यातील ट्रक चालकास विकला व यातील ट्रक चालकाने सदरच्या मालाविषयी कोणतीही खात्री न करता, सदरचा माल विकत घेवुन बाहेर विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना मिळुन आला.
दिनांक 24/11/2022 रोजी रात्री हिमालय पेट्रोलपंप नगर रोड जामखेड येथे यातील ट्रक चालक नामे-शिवाजी बबन गफाट, वय 37 वर्षे, रा. इंदापुर, ता. वाशी. जि. उस्मानाबाद हा रात्रीच्या वेळी त्याच्याकडे महाराष्ट्र शासनाचे कोणतेही बील पावती, परवाना नसताना ट्रकमधील तांदुळ अवैधरित्या काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करताना तसेच यातील मालाचा मालक-अमर बसंत लवटे वय 31 वर्षे धंदा-व्यापार, रा. ईट ता. भुम.जि. उस्मानाबाद याने सदरचा माल हा कोठुन तरी चोरीने मिळवुन अथवा खरेदी करुन यातील ट्रक चालकास विकला आहे. म्हणुन भादवी कलम 411 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.