जामखेड शहरात नुकतेच एक दमदार लग्न पार पडले. या लग्नात आलेल्या पुण्यातील एका नातेवाईकाला जामखेडला लग्नाला जाणे भलतेच महाग पडले. नवरदेव परण्याची मिरवणुक पाहत असलेल्या नातेवाईकाच्या हातातील पिशवीतील पाच लाख रूपये किमतीचे दागिणे चोरीस जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
लग्न सोहळ्यातून इतकी मोठी चोरीची घटना घडत असेल तर मंगल कार्यालये किती असुरक्षित आहेत हेच यातुन स्पष्ट होते. यापुढे असे प्रकार टाळण्यासाठी जामखेड शहर व तालुक्यातील सर्वच मंगल कार्यालयांच्या परिसरासह मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्यादृष्टीने आता सक्तीने उपाययोजना राबवणे आवश्यक आहे.
या घटनेसंबंधी पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड – कर्जत रस्त्यावरील त्रिमुर्ती मंगल कार्यालयात दि 24 रोजी एक लग्नसमारंभ होते. या लग्न समारंभासाठी व्यवसायाने सीए असलेले पुणे येथील निलेश उध्दवराव देशमुख ( वय 39) हे आले होते. यावेळी ते मंगल कार्यालयाच्या परिसरात नवरदेव परण्याची मिरवणुक पाहत असतानाच यावेळी असलेल्या गर्दीचा फायदा उचलून त्यांच्या हातात असलेल्या कापडी पिशवी ब्लडने कापून त्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याची घटना घडली. घटना उघडकीस येताच लग्नसोहळ्यात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेत अज्ञात चोरट्याने देशमुख यांच्या ताब्यातील पिशवीतील सुमारे चार लाख पन्नास हजार रूपयांच्या दागिण्यांवर डल्ला मारला आहे. या चोरीमध्ये सोन्याचे गंठण व रानीहार चोरीस गेला आहे. दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनला याप्रकरणी निलेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात कलम 379 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.