जामखेड टाईम्स वृत्तसेवा: शुक्रवारी सायंकाळपासुन जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराशेजारील विहीरीत आढळून आल्याने फक्राबाद परिसरात खळबळ उडाली आहे. (Six-year-old boy drowns in well)
सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील संग्राम संतोष भोसले हा सहा वर्षीय चिमुकला फक्राबाद येथून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपासुन बेपत्ता झाला होता. सोशल मिडीयावर त्याच्या शोधासाठी पोस्ट वायरल करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काल सायंकाळपासुन कुटूंबीय व गावकरी त्याची शोधाशोध करत होते. शनिवारी सकाळी भोसले यांच्या गट नंबर 297 मधील विहीरीत रज्जाक शेख व त्याच्या सहकार्यांना संग्राम याच्या चपला तरंगताना आढळून आल्या.
दरम्यान विहीरीत चपला जरी असल्या तरी संग्रामचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यातच विहीरीला सूमारे चार ते पाच परस पाणी असल्याने गावकर्यांनी विहीरीतील पाणी उपसण्याचा निर्णय घेतला. मोटारीसह जनरेटरच्या सहाय्याने पाणी उपसण्यात आले. सकाळी आठ वाजेपासुन ते दुपारी दोन वाजेपर्यंत विहीरीतील पाणी उपसा केल्यानंतर संग्रामचा मृतदेह विहीरीतील बाभळीच्या फांदीत अडकल्याचे निदर्शास आले अशी माहिती पोलिस पाटील योगेश जायभाय यांनी दिली.
त्यानंतर काकासाहेब जाधव, नितीन राऊत, मन्सुर शेख, अंगद पोकळे, शरद खताळ यांनी विहीरीत उतरून दोरीच्या सहाय्याने मयत संग्रामचा मृतदेह विहीर बाहेर काढला. दरम्यान विहीरीवर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेह विहीरीबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक रमेश फुलमाळी हे करत आहेत. यावेळी सरपंच विश्वनाथ राऊत, पोलीस पाटील योगीनाथ जायभाय, कोतवाल महेबूब शेख, तलाठी भुक्तारे आर. जी, चेअरमन माणिकराव देशपांडे, रज्जाक शेख, संजय जायभाय, मज्जु शेख सह आदी उपस्थित होते.