moneylender | धक्कादायक: महिन्याला 40% व्याज घेत होता सावकार : जामखेडमध्ये आणखी एका सावकारावर गुन्हा दाखल !

राजकीय आश्रय असलेल्या बड्या सावकारांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Another moneylender has been booked at Jamkhed police station | जामखेड तालुक्यात सुरू असलेला अवैध सावकारकीचा गोरखधंदा उध्वस्त करण्यासाठी जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आता ॲक्शन मोडवर आले आहेत. सलग दुसर्‍या दिवशी सावकारकीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे आता सावकारांचे भलतेच धाबे दणाणले आहेत. राजकीय आश्रय असलेल्या बड्या सावकारांच्या मुसक्या कधी आवळल्या जाणार याकडे जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

जामखेड तालुक्यात सावकारांचा मोठा सुळसुळाट आहे. सावकारांची संघटित टोळी सक्रिय आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेकांनी घरेदारे सोडून परजिल्ह्यात जावे लागले आहे. अनेक जण तक्रारीस पुढे येत नाहीत कारण सावकारांची गुंडशाही, सावकाराकडून जीवाला धोका होऊ शकतो या भीतीने अनेक जण सावकारांचा जाच सहन करत जगत आहेत.

जामखेडच्या माजी नगरसेवकासह तीन जणांवर सावकारकीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता दुसरे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात जामखेडमधील एका विरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गणेश अभिमान भानवसे याने फिर्याद दाखल केली आहे. (Shocking: 40% interest was being charged per month Moneylender: Another case has been registered against another Moneylender in Jamkhed )

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील रसाळनगर भागात राहणारा गणेश भानवसे याने आरोपी दिपक चव्हाण याच्याकडून  01 लाख 30 हजार रूपये दर महा 40% व्याजाने घेतले होते. पैसे देताना चव्हाण याने फिर्यादीकडून हमीपोटी चार कोरे चेक घेतले होते. फिर्यादीने आरोपीला गुगल पे द्वारे व रोख असे अनेकदा व्याजाचे पैसे दिले होते. तसेच आरोपी चव्हाण याने भानवसे याच्या दुकानातून बळजबरीने 47 हजार रूपये किमतीचा टि व्ही घेऊन गेला होता. जर कुणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली होती.

दरम्यान त्यानंतरही आरोपीने फिर्यादीकडून 15/09/2021 पर्यंत पैश्याचे व्याज घेतले होते. तसेच दि. 23/09/2021 रोजी आरोपी चव्हाण हा फिर्यादीच्या घरात घुसला होता. यावेळी त्याने मोठा राडा करत फिर्यादीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली होती. तसेच तुझा नवरा कोठे गेला. त्याला माझे पैसे व त्या पैश्यावरील व्याज द्यायला सांग नाहीतर मी त्यास जिवे मारीत असतो अशी धमकी व शिवीगाळ फिर्यादीच्या पत्नीला दिली होती असे फिर्यादीत म्हटले आहे.

जामखेड पोलिस स्टेशनला गणेश अभिमान भानवसे वय 34, रा रसाळनगर यांच्या फिर्यादीवरून दिपक अशोक चव्हाण रा धर्मयोध्दा चौक, तपनेश्वर रोड जामखेड याच्या विरोधात गुन्हा रजि  432 /2021 भा.द.वि.क. 387,384,452,504,506 सहमहाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.

जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यातील अवैध सावकारकीचा गोरखधंदा उध्वस्त करण्यासाठी उचलले पाऊल कौतुकास्पद आहे. परंतु राजकीय आश्रय असलेल्या पांढरपेश्या सावकारांविरोधात जोवर मोठी कारवाई होणार नाही तोवर जनतेत विश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही हेही तितकेच सत्य आहे.

 

web title: Another moneylender has been booked at Jamkhed police station