जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 1 नोव्हेंबर 2022 । जामखेड तालुक्यातील डोळेवाडीत भावकीचा वाद उफाळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत दोन गटांत तुफान राडा झाला. हाणामारीच्या या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत, त्यानुसार दोन्ही गटातील 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथे शेतात रस्ता करण्याच्या कारणावरून भावकीच्या दोन गटांत तुफान राडा झाला. दोन्ही गटांकडून ऐकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दगड व लोखंडी पाईपने याचा वापर करण्यात आला. दोन्ही गटांकडून ऐकमेकांना शिविगाळ करत ऐकमेकांचा काटा काढण्याची दमबाजी करण्यात आली. मारहाणीच्या या घटनेत वैजीनाथ डोळे आणि सुमनबाई डोळे हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचार करण्यात आले.
वैजीनाथ सदाशिव डोळे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी दगडू डोळे, केशव दगडू डोळे, मीनाक्षी केशव डोळे, कांताबाई शिवाजी डोळे, सर्व राहणार डोळेवाडी ता. जामखेड यांच्याविरोधात कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रस्ता करण्यास मी सांगितले असे का म्हणतो ? असे म्हणून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोपींकडून मारहाण करण्यात आली.
तर दुसरीकडे शिवाजी दगडू डोळे, वय-41 राहणार डोळेवाडी ता.जामखेड यांच्या फिर्यादीवरून वैजनाथ सदाशिव डोळे, भरत दिलीप डोळे, कृष्णा महादेव डोळे, सदाशिव राऊसाहेब डोळे, काशीबाई सदाशिव डोळे, सुमन महादेव डोळे सर्व राहणार डोळेवाडी ता. जामखेड यांच्याविरोधात कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तू ग्रामपंचायतला आमचे रानात रस्ता करायचा का सांगितला असे म्हणत फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोपींकडून मारहाण करण्यात आली.
दरम्यान डोळेवाडीतील मारहाणीची घटना 30 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. या प्रकरणी 31 ऑक्टोबर रोजी जामखेड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.