खंडणीसाठी सराईत गुंडांचा जामखेडमधील कलाकेंद्रांवर धुडगूस, जामखेड पोलिस स्टेशनला आठ जणांविरोधात गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या काळात शांत झालेले जामखेड शहर गायकवाड यांच्या बदली नंतर पुन्हा अशांत होऊ लागले आहे, याचाच प्रत्यय जामखेड शहरातून समोर आला आहे. खंडणीसाठी सराईत गुन्हेगारांच्या टोळीने जामखेडमधील 3 कलाकेंद्रांवर धुडगूस घालण्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे जामखेड शहरात पुन्हा एकदा गुंडाराज बस्तान बसवू लागले की काय ? अशी भीती आता जनतेत निर्माण झाली आहे.
मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेल्या जामखेड शहरात कुख्यात गुन्हेगारांचा नेहमी उघड वावर असतो, या गुन्हेगारांच्या संपर्कात स्थानिक तरूण आल्याने जामखेडमध्ये गेल्या काही वर्षांत गुंडांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या. जामखेड तालुक्यात सक्रीय असलेल्या गुन्हेगारांच्या टोळ्यांना आवर घालण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि त्यांच्या टीमने मागील अडीच तीन वर्षे मोठी मेहनत घेतली होती. त्यांनी अनेक मोठ्या कारवाया पार पाडत तालुक्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित केले होते. या काळात गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रचंड धाक निर्माण झाला होता.
गायकवाड यांच्या बदलीनंतर पोलिस निरीक्षक महेश पाटील जामखेडला रूजू झाले आहेत. पाटील हे सध्या जामखेड समजून घेत आहेत. डॅशिंग अधिकारी असा त्यांचा नावलौकिक आहे. लवकरच ते धडक कारवाईचा मोठा दणका गुन्हेगारांना देतील, अशी जामखेडच्या जनतेची अपेक्षा आहे.
दरम्यान कलाकेंद्र चालकांनी हप्ता न दिल्याने गुंडांच्या टोळीने जामखेड शहरातील तीन कलाकेंद्रावर धुडगूस घालण्याची घटना घडली आहे. या घटनेत गुंडांच्या टोळीने लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने कलाकेंद्रातील साहित्यांची तोडफोड केली तसेच दगडफेक केली. या प्रकरणी एकुण सात ते आठ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खंडणी व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कलाकेंद्र चालक लता शालन जाधव (वय 55 ) यांच्या फिर्यादीवरून अक्षय उर्फ चिंग्या मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) तुषार पवार,(पुर्ण नाव माहीत नाही) सोम्या पवार (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. जांबवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर व इतर 4 ते 5 अनोळखी युवक अशा एकुण 7 ते 8 जणांविरोधात भा.द.वि. कलम- 385, 324, 336, 504, 506,427,143,147,148,149 प्रमाणे जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय ?
21 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जामखेड शहरातील झंकार सांस्कृतिक कला केंद्र, जगदंबा सांस्कृतिक कला केंद्र व भाग्यलक्ष्मी कला या तीन कलाकेंद्रावर अक्षय उर्फ चिंग्या मोरे, तुषार पवार, सोम्या पवार सह 4 ते 5 तरूणांचे टोळके गेले होती. यावेळी या टोळीने जर तुम्हाला कलाकेंद्र चालवायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता आम्हाला द्यावा लागेल असा तीन्ही कलाकेंद्राच्या चालकांना त्यांनी दम दिला.
यावेळी कलाकेंद्र चालकांनी हप्ता देण्यात नकार दिल्याने या टोळक्याने या तिन्ही कलाकेंद्रावर धुडगूस घातला आरोपींनी कलाकेंद्राच्या खिडक्यावर दगडफेक केली तसेच काही आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने कलाकेंद्रातील खुर्च्या, कुलर, गाड्या, पीओपीची मोडतोड करत नुकसान केले. तुम्ही जर आता हप्ता दिला नाही तर तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी देत आरोपींनी तेथून निघून गेले.
आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी लता शालन जाधव, कलाकार निता खवळे बारामतीकर, शारदा खवळे बारामतीकर या तिघी जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.
जामखेड शहर शांत रहावे, तालुक्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित व्हावे, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जामखेड पोलिसांनी मागील काळात ज्या कठोर उपाययोजना राबवल्या होत्या त्या आता नव्याने राबविण्याची आवश्यकता आहे. जामखेडमध्ये पोलिसांचा धाक अन दरारा निर्माण करण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश पाटील आणि त्यांची टीमने तातडीने ॲक्शनमोडवर येण्याची आवश्यकता आहे.
जामखेड शहरातील तीन कलाकेंद्रावर धुडगूस घालणाऱ्या टोळीतील आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर जामखेड पोलिस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याच्याविरोधात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर तुषार हनुमंत पवार याच्याविरोधात तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.