जामखेड : शेजाऱ्यानेच शेजाऱ्याला चुना लावला, मात्र चोवीस तासांत जामखेड पोलिसांनी आरोपीचा डाव हाणून पाडला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यानेच शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्याला चुना लावण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर संबंधित शेतकऱ्याने जामखेड पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होताच अवघ्या चोवीस तासांत जामखेड पोलिसांनी आरोपींचा डाव उधळून लावला आणि मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्याची धडक कारवाई पोलिसांनी पार पाडली.
त्याच झालं असं की, जामखेड तालुक्यातील महारूळी येथील अशोक दत्तु यवले या शेतकऱ्याच्या गट नंबर 111 मधून 15 हजार रूपये किमतीची शेरा कंपनीची पाणबुडी विद्यूत मोटार 18 सप्टेंबर 2022 रोजी चोरीस जाण्याची घटना घडली होती. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरणातील आरोपी हे भूमच्या दिशेने मुद्देमाल घेऊन गेले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड आणि पोलिस नाईक अजय साठे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस नाईक अजय साठे हे आरोपींच्या शोधासाठी तातडीने भूमच्या दिशेने रवाना झाले होते.
सदर आरोपी भूम तालुक्यातील पाथरूड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळून येताच त्यांना नागरिकांनी पकडले. त्यानंतर त्यांना भूम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान भूम पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना जामखेड पोलिसांनी ताब्यात घेऊन जामखेडला आणले.
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे जामखेड पोलिसांनी कसून चौकशी केली असता, सदर आरोपी हे फिर्यादीच्या घराशेजारीच राहत असल्याची माहिती उघड झाली. घराशेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यानेच शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्याला चुना लावण्याचा प्रकार यानिमित्ताने उघडकीस आला. या प्रकरणी महारूळी गावातील काशिनाथ भानुदास ढेपे व धनंजय भारत थोरात या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासांत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल जामखेड पोलिसांचे कौतूक होत आहे.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईच्या पथकात पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेबल नवनाथ शेकडे, होमगार्ड राहूल भिसे यांचा समावेश होता.