जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed Big Breaking| जामखेड तालुक्यातील अवैध खाजगी सावकारांविरोधात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी उघडलेल्या धडक मोहिमेला मोठे यश आले. तालुक्यातील दोघा सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील अवैध खाजगी सावकारी मोडून काढण्यासाठी जामखेड पोलिसांनी कंबर कसली आहे. या मोहिमेनुसार जामखेड पोलिस स्टेशनला दोघा सावकारांविरोधात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे खाजगी सावकारांविरोधात फिर्याद देण्याची खमकी भूमिका महिलांनी घेतल्याचे दिसत आहे.
जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथील एका खाजगी सावकाराविरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात म्हटले आहे की, फिर्यादी महिलेच्या नवर्याने महादेव शिवदास खाडे या खाजगी सावकाराकडून सुमारे 09 महिन्यापूर्वी एक लाख सत्तर हजार रूपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. या रकमेसाठी 3 टक्के व्याज अकारण्यात आले होते. रक्कम देताना सावकाराने फिर्यादीच्या नवऱ्याकडून गट नं. 89 मधील 25 गुंठे शेती खरेदी करून घेतली होती.
सावकाराचे पैसे देण्यासाठी दि 24 नोव्हेंबर रोजी फिर्यादीचा नवरा हा खर्डा येथे पैसे आणण्यासाठी गेला होता. तर फिर्यादी महिला ही शेतात जनावरे बांधण्यासाठी गेली असता सावकार महादेव खाडे हा शेतात आला व फिर्यादीस म्हणाला की, हे शेत मी विकत घेतले आहे. तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणुन फिर्यादीचा हात धरून, छाती दाबुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्याने केले होते.
यावरून जामखेड पोलिस स्टेशनला आशा महादेव खाडे वय 24 वर्ष धंदा शेती रा. घुलेवस्ती, डोळेवाडी ता. जामखेड या महिलेच्या फिर्यादीवरून महादेव शिवदास खाडे रा. डोळेवाडी ता. जामखेड या सावकाराविरोधात गुरनं व कलम 497/2021 भा.द.वि. कलम 354, 506 सावकारी अधि. 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस डि व्ही भागवत हे करत आहेत.
तर जामखेड तालुक्यात वाघा येथील एका खाजगी सावकाराविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जवळा येथील एका महिलेने जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
यात म्हटले आहे की, शेतजमिनीच्या खरेदीची नोंद होऊ नये यासाठी नान्नज येथील तलाठी कार्यालयात वाघा येथील शामराव बारस्कर याने तक्रार दाखल केली होती त्याची विचारणा करण्यासाठी फिर्याद व त्यांचे पती गेले होते. त्यावेळी आरोपी शामराव बारस्कर हा म्हणाला की, मी तुम्हाला ट्रॅक्टर घेण्यासाठी दिलेल्या दोन लाख रुपयांच्या व्याजापोटी 14, 00,000/-मला रुपये दिल्याशिवाय मी तुमच्या खरेदीची नोंद करून देणार नसल्याचे सांगितले.
त्यावर फिर्यादी व त्यांचे पती यांनी आरोपीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांचे काहीएक ऐकून न घेता कडुनिंबाची काठी मोडून फिर्यादीच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादी भांडण सोडविण्यास गेली असता आरोपीने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ काठी मारून हाताला दुखापत केली.तसेच शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.ही घटना 19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली होती.
त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनला 25 नोव्हेंबर रोजी मंगल बाळासाहेब रोडे (वय 55 वर्ष) राहणार जवळा,तालुका जामखेड यांच्या फिर्यादीवरून वाघा येथील शामराव माणिकराव बारस्कर यांच्याविरोधात गु रजि नं.व कलम 499/ 2021 भादवि कलम-324, 504, 506 प्रमाणे तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम सन 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.