जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड शहरात दरोडेखोरांच्या टोळक्याने सोमवारी पहाटे धुडगूस घातला. शहरातील शिक्षक काॅलनीत दरोडा पडला असून या घटनेत तलवारीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी मोठा ऐवज लंपास केला. भल्या पहाटे घडलेल्या घटनेने जामखेड शहर हादरून गेले आहे.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी परिसरात 27 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळक्याने एसटी ड्रायव्हरच्या घरावर दरोडा टाकला.किचनचा दरवाजा कशाने तरी तोडून पाच अनोळखी दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला आणि तलवारीचा धाक दाखवून बेडरूममधील कपाटाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
जामखेड शहरामधील बीड रोडवरील शिक्षक काॅलनी परिसरात एस टी ड्रायव्हर विजय नवनाथ खुपसे (वय 40) हे राहतात. ते नेहमीप्रमाणेच आपल्या कुटुंबासह घरात झोपी गेलेले असताना 27 रोजी पहाटे 3 वाजता पाच अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घरातील लोकांना दरोडेखोरांनी सुरा आणि तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सुमारे 93 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये सोने आणि रोख रकमेचा समावेश आहे.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला विजय नवनाथ खुपसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. यावरून जामखेड पोलिस स्टेशनला पाच अज्ञात दरोडेखोरांविरोधात भा.द.वि.क. 395 सह भारतीय हत्यार कायदा क 4/25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.
जामखेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना थांबल्या होत्या. परंतू सरत्या वर्षाला निरोप देत असताना पुन्हा एकदा चोरटे सक्रीय झाले आहेत. चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त होणे आवश्यक आहे. दरम्यान शिक्षक काॅलनीत पडलेल्या दरोड्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जनतेत भीती पसरली आहे.