जामखेड : विवाहित तरूणीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हे दाखल, हुंडाबळीच्या घटनेने जामखेड तालुका हादरला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातून हुंडाबळीची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, या घटनेत हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळास कंटाळून 22 वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिसांत सासरच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हुंडाबळीच्या या घटनेने जामखेड तालुका हादरून गेला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरातील संताजीनगर भागात राहणाऱ्या प्रतीक्षा विजय चव्हाण, वय 22 वर्ष या विवाहित तरुणीने सासरच्या त्रासास कंटाळून आत्महत्या केल्याची घटना 1 फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी मयताचे वडील अंकुश तुकाराम सगळे ,वय 50 वर्ष ,धंदा- शेती राहणार, सगळे वाडी ,तालुका -पाटोदा, जिल्हा बीड यांनी मयत प्रतीक्षा हिचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ होत होता अशी तक्रार जामखेड पोलिसांत दिली. त्यानुसार जामखेड पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड पोलिस स्टेशनला मयताचे वडील अंकुश तुकाराम सगळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून 1) पती- विजय दिलीप चव्हाण 2 ) सासू -सुरेखा दिलीप चव्हाण 3) सासरे- दिलीप नामदेव चव्हाण 4) दीर -अजय दिलीप चव्हाण 5)ननंद -दिपाली निलेश कोल्हे .सर्व राहणार -संताजी नगर जामखेड यांच्याविरोधात गु. र. नं. र. जी. 39/2023 भा.द.वि. कलम 306 ,498 ,(A) 304 (B),34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मयताचे वडिल अंकुश सगळे यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी मुलगी प्रतीक्षा हिचा 5/2/2020 रोजी विवाह झाला होता.ती सासरी नांदत असताना विवाहानंतर सहा महिन्यानंतर तिला सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरूवात झाली होती, गाडी घेण्यास माहेरहून पाच लाख रूपये आणावेत यासाठी सासरच्या मंडळींकडून मयताकडे तगादा लावला जायचा. तसेच मयत प्रतीक्षा हिला स्वयंपाक भाजी नीट येत नाही. लग्नात हुंडा दिला नाही, असे म्हणून सासरच्या मंडळींकडून शिवीगाळ, मारहाण करून तिचा वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ केला जायचा, सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासास कंटाळून प्रतीक्षा हिने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, संताजीनगर भागात प्रतीक्षा विजय चव्हाण, वय 22 वर्ष या विवाहित तरुणीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जामखेड ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व पोलिस नाईक अजय साठे हे करत आहेत.