जामखेड : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास तलवारीने मारहाण, पाच जणांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून सारोळा येथील एकास तलवार, लोखंडी पाईप आणि दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील जखमी फिर्यादीवर अहमदनगर येथील मॅककेअर हाॅस्पीटल उपचार सुरु आहेत. या प्रकरणात जामखेड पोलिस स्टेशनला पाच जणांविरोधात आर्म ॲक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जामखेड तालुक्यातील सारोळा येथील रहिवासी अंगद किसन सांगळे (वय 46) हे 7 डिसेंबर रोजी ज्यूपीटर स्कुटी क्रमांक एम एच 16 सी एल 5922 यावरून खर्डा – जामखेड रोडने जामखेड गावाकडे येत असताना बटेवाडी शिवारात दिनेश खरात आणि त्यांच्या चार ते पाच साथीदारांनी सांगळे यांची गाडी थांबवत त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सांगळे यांनी पैसे देण्यास नकार दिला असता खरात आणि त्यांच्या साथीदारांनी सांगळे यांना लोखंडी तलवार, लोखंडी पाईप आणि दगडाने बेदम मारहाण केली.
या घटनेत अंगद सांगळे हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी आरोपींनी त्यांच्या खिश्यातून रोख दहा हजार रूपये, दोन तोळे वजनाची सोन्याची चैन तसेच विवो कंपनीचा मोबाईल लंपास केला. तसेच जाता जाता सांगळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेत आरोपींनी केलेल्या मारहाणीमुळे अंगद सांगळे यांच्या डोक्याला,डाव्या हाताच्या पंजाला व उजव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली आहे. सांगळे यांच्या डोक्याला 30 पेक्षा अधिक टाके पडले आहेत.सध्या त्यांच्यावर अहमदनगरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, जखमी अंगद किसन सांगळे यांच्या जबाबावरून जामखेड पोलिस स्टेशनला 8 डिसेंबर रोजी रात्री उशिरा बटेवाडी येथील दिनेश खरात आणि त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरुद्ध कलम 329, 143, 147, 148, 149, आर्म ॲक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.