जामखेड टाईम्स वृत्तसेवा । दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून एकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना आज जामखेड तालुक्यातील आपटी या गावातून समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जामखेड पोलिसांनी अवघ्या दोन तासात नान्नज येथून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली.
दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून छगन बबन गोरे याने बाबासाहेब महादेव जगदाळे (वय 65) यांचे डोके रस्त्यावर आपटून खून केल्याची धक्कादायक घटना आज आपटी गावात घडली आहे.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
या प्रकरणी आपटी येथील आरोपी छगन गोरे याला सिनेस्टाईल पाठलाग करून जामखेड पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मयताचे जावाई देवरथ मिसाळ यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी देवरथ गंगाराम मिसाळ (वय40) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज 19 एप्रिल रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास मी घरी असताना घरातील साखर संपल्याने साखर आणण्यासाठी आपटी बसस्टॅन्डवरील रामभाऊ गोरे यांच्या किराणा दुकानात गेलो होतो, साखर घेत असताना आपटी ते पिंपळगाव या रस्त्यावर आरडा ओरडा होत असल्याचा आवाज आल्याने मी पुढे जाऊन पाहिले असताना छगन बबन गोरे हा माझे सासरे बाबासाहेब महादेव जगदाळे यांना “तु मला दारु पिण्यासाठी पैसे दे.” असे मोठ-मोठ्याने म्हणुन त्यांना धक्काबुक्की करीत होता.
त्यावेळी माझे सासरे हे छगन गोरे याला “माझ्या कडे पैसे नाहीत.” असे सांगत असताना छगन गोरे याने माझे सासरे बाबासाहेब जगदाळे यांना हाताने उचलुन डांबरी रस्त्यावर खाली आपटले. त्यामुळे माझे सासरे मोठ्याने ओरडले. त्यावेळी मी माझे सासरे यांना वाचविण्यासाठी पुढे जात असतानाच छगन गोरे याने माझे सासरे बाबासाहेब जगदाळे यांना परत त्याच्या हातांनी उचलुन त्यांना डोक्याच्या बाजुने डांबरी रस्त्यावर आपटले. त्यामुळे माझे सासरे डोके फुटून, डोक्याला चिर पडुन रक्त येवून जाग्यावर निपचित पडले.
त्यावेळी किराणा दुकानदार रामभाऊ गोरे, तानाजी विष्णु गोरे, माझा मेव्हणा दिपक जगदाळे व गावातील इतर लोक त्या ठिकाणी पळत आले. त्यामुळे छगन गोरे हा त्या ठिकाणावरुन पळुन गेला. त्यावेळी मी माझे सासरे यांच्याजवळ जावुन त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते आचक्या देत असल्याने मी किराणा दुकानातुन पाणी आणुन पाजले परंतु त्या वेळी माझे सासरे यांचा जीव गेलेला होता असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला, जामखेड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी भेट दिली.
दरम्यान पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक राजु थोरात यांच्यासह पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोना जाधव, पोशि शेषराव म्हस्के, पोशि पवार, पोशि आबासाहेब आवारे, अजय साठे यांच्या पथकाने घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपीचा पाठलाग करून त्याला अवघ्या दोन तासात नान्नज येथून ताब्यात घेण्याची धडक कारवाई पार पाडली.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे हे पुढील तपास करत आहेत.