व्याजाच्या पैश्याच्या वसुलीसाठी जामखेडमधून रिक्षाचालकाचे अपहरण, जामखेड पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील एका सावकाराने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने, जामखेड शहरातील रिक्षा चालकाचे अपहरण करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्याजाच्या पैश्याच्या वसुलीसाठी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती भागात आबेद खलील शेख (वय 35 वर्षे) हा रिक्षा चालक राहतो, त्याने काही दिवसांपुर्वी कुसडगाव येथील पप्पू कात्रजकर याच्याकडून 10 हजार रूपये व्याजाने घेतले होते. दि 25 रोजी आबेद शेख जामखेड बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टँडवर थांबलेला होता, त्यावेळी आरोपी पप्पु कात्रजकर हा आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसह तिथे आला.
त्यावेळी त्याने फिर्यादीस म्हटले की, माझ्याकडून तु दहा हजार रूपये व्याजाने घेतले आहेत, त्याचे 2 लाख रूपये व्याजाचे तुझ्याकडे राहिले आहेत, ते मला अत्ताच्या अत्ता दे असे म्हणत आरोपी व त्याच्या तिघा सहकाऱ्यांनी फिर्यादीस पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीत बळजबरीने बसवत अपहरण केले. त्यानंतर फिर्यादीस कुसडगाव येथील हाॅटेल जगदंबा याठिकाणी नेण्यात आले. तिथे फिर्यादीस आरोपींकडून शिवीगाळ करत बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. यात फिर्याद हा जखमी झाला.
दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनला आबेद खलील शेख याच्या फिर्यादीवरून पप्पू कात्रजकर आणि अन्य तिघा अनोळखी इसमांविरूध्द कलम 363, 324, 323, 504, 506, 34 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत. जामखेड पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या दणक्यानंतर सावकार आणि त्यांचे वसुली पंटर हे थंडावले होते, मात्र पुन्हा एकदा सावकारांच्या टोळ्या तालुक्यात सक्रीय झाल्याचे दिसत आहेत.सावकारांचा बिमोड करण्यासाठी पुन्हा एकदा जामखेड पोलिसांनी विशेेष धडक मोहिम हाती घेण्याची आवश्यकता आहे. जामखेड शहर व तालुक्यात अंडर ग्राऊंड असलेल्या सक्रीय सावकारांचा बिमोड होणे आवश्यक आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे.