धक्कादायक : प्रेम प्रकरणातून शिक्षिकेचा मृत्यू; आरोपी शिक्षक पती-पत्नी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कोपरगाव येथे कार्यरत विवाहित शिक्षिकेचे जामखेडमध्ये राहणाऱ्या एका विवाहित शिक्षकावर प्रेम जडले. दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. लग्नाचाही फैसला झाला. पण अचानक माशी शिंकली आणि प्रियकर शिक्षकाकडून लग्नास नकार देण्यात आला. मग काय शिक्षिकेने जामखेड गाठले. जामखेडला येताच तिने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार झाले. शिक्षिका ठिक झाली. पण महिन्यानंतर पुन्हा तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रियकर शिक्षक आणि त्याच्या पत्नीविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत शिक्षिका संतुकाबाई वाघुजी भिसे (वय 34) ह्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत कार्यरत होत्या.12 वर्षापुर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुले होती. गेल्या चार वर्षांपासून मयत शिक्षिकेचे आपल्या पतीशी पटत नसल्याने त्या वेगळ्या राहत होत्या. याच काळात त्यांची जामखेड शहरात राहणाऱ्या परमेश्वर बोडखे या शिक्षिकाशी ओळख झाली. मयत शिक्षिका आणि बोडखे यांची जुनी ओळख होती.
याच जुन्या ओळखीतून मयत शिक्षिका आणि जामखेड शहरात राहणारा शिक्षक परमेश्वर बोडखे यांच्यात प्रेम फुलले. यातून मग दोघांच्या भेटी गाठी वाढल्या.दोघांनी प्रेमाच्या आणा भाका घेत लग्नाचा फैसला केला. दोघे चार महिन्यांपासून कोपरगावात एकत्र राहू लागले. मात्र शिक्षक असलेल्या परमेश्वर बोडखेच्या प्रेम प्रकरणाचा भांडाफोड झाला. परमेश्वर बोडखे आणि त्याच्या शिक्षक असलेल्या पत्नीत मोठा वाद झाला. मग बोडखे हा प्रियसीला सोडून पुन्हा पत्नीकडे जामखेडला राहायला आला.
दरम्यान, 9 जूलै 2022 रोजी प्रियसी शिक्षिकेने प्रियकर शिक्षकाची भेट घेण्यासाठी जामखेड गाठले. मयत शिक्षिकेने प्रियकराच्या घरी जाऊन विष प्राशन केले. त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या पत्नीने तिला जामखेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती प्रियसीच्या आईला प्रियकर शिक्षकाने कळवली.
घटनेची माहिती मिळताच मयत शिक्षिकेची आई तातडीने जामखेडला दाखल झाली. त्यानंतर मयत शिक्षकेला पुढील उपचारासाठी नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर मयत शिक्षिकेला घरी सोडण्यात आले होते. मात्र महिनाभरानंतर त्या शिक्षिकेला पुन्हा त्रास होऊ लागला होता. नांदेडमधील रूग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा 9 सप्टेंबर 2022 रोजी मृत्यू झाला.
याप्रकरणी मयत शिक्षिका संतुकाबाई वाघोजी भिसे हिच्या आईने 18 ऑक्टोबर रोजी जामखेड पोलिस स्टेशनला आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या परमेश्वर धर्माजी बोडखे आणि मालुबाई परमेश्वर बोडखे या पती पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या दोघे फरार आहेत. दोघांविरुद्ध कलम 306, 504, 506 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपी शिक्षक परमेश्वर धर्माजी बोडखे आणि मालुबाई परमेश्वर बोडखे यांचं कुटुंब नांदेडच्या हातगाव तालुक्यातील सावरगाव येथील आहे. बोडखे हे जामखेड शेजारील पाटोदा येथे नौकरी होते. तर जामखेड शहरातील शिक्षक काॅलनी परिसरात ते राहत होते.
दरम्यान मयत शिक्षिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी शिक्षक परमेश्वर धर्माजी बोडखे आणि त्याची मालुबाई परमेश्वर बोडखे या दोघांनी माझ्या मुलीच्या लग्नास विरोध केला. तसेच मुलीकडून उसने घेतलेले पाच लाख रूपये देण्यास नकार दिला. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून माझ्या मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.