जामखेड टाईम्स वृत्तसेवा : खर्डा खून प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली असून, विशाल सुर्वेचा ज्या हत्याराने खून करण्यात आला होता, ती हत्यारे आरोपींकडून हस्तगत करण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे.
खर्डा शहराजवळील सुर्वेवस्ती येथे राहणारा 32 वर्षीय युवक विशाल सुर्वे याची अतिशय निर्घूणपणे 13 मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने आरोपींच्या शोधासाठी वेगाने तपास हाती घेतला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या 24 तासांत या प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह तिघांना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली होती.
अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने विशाल सुर्वेचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. विशालचा खून त्याच्याच बायकोने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला होता. कट करून विशालचा 13 मे रोजी अतिशय निर्घूणपणे खून करण्यात आला होता. पती – पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस येताच जामखेड तालुका हादरून गेला होता.
आरोपींनी पंचासमक्ष काढून दिले हत्यारे
दरम्यान विशाल सुर्वेचा खून केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेला लोखंडी राॅड गोपाळओढा तलावात फेकून दिला होता, ही बाब अटकेत असलेल्या आरोपींनी कबूल केली होती, गुन्ह्यात वापरलेले हत्यारं शोधण्यासाठी पोलिसांनी संबंधित आरोपींना गोपाळओढा तलाव परिसरात नेले असता, आरोपींनी तलावातून 3 फुट लांबीचा लोखंडी राॅड काढून दिला, पोलिसांनी पंचासमक्ष तो लोखंडी राॅड पंचनामा करत ताब्यात घेतला.
गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त
विशाल सुर्वेचा खून करण्यासाठी आरोपी ज्या मोटारसायकलवरुन आले होते, ती मोटारसायकल जामखेड पोलिसांनी जप्त केली. पंचासमक्ष त्या मोटारसायकलचा पंचनामा करण्यात आला.
रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त
विशाल सुर्वेचा खून करणार्या आरोपींनी विशालचा खून केल्यानंतर ज्या भागात रक्ताचे डाग असलेले कपडे फेकून दिले होते ते कपडे, तसेच रक्ताचा डाग असलेला रुमाल पोलिसांना काढून दिले, तसेच मयताचे पाकिट ज्या ठिकाणी जाळले होते ती जागाही पोलिसांना दाखवली.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी ज्या चाणाक्षपणे तपासाची सूत्रे फिरवली त्यातून आरोपींच्या मुसक्या तर आवळल्या गेल्याच शिवाय आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात जामखेड पोलिसांना मोठे यश आले आहे. अजूनही या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ज्यांच्याविरूध्द सबळ पुरावे सापडतील त्यांचा करेक्ट कार्यक्रम निश्चित आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
विशाल सुर्वे खुन प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, हेड काँस्टेबल संजय लाटे , पोलिस नाईट संभाजी शेंडे, पोलिस काँस्टेबल सचिन पिरगळ, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, संदिप राऊत, अरूण पवार, शशी म्हस्के आणि पंचासमक्ष गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, मोटारसायकल, आणि रक्ताचा डाग असलेला रुमाल, मयताचे पाकिट ज्या ठिकाणी जाळले ते ठिकाण दाखवले यातून आरोपींविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळाले आहेत.