जामखेड:तालुक्यात विविध गुन्ह्यातील फरार आरोपींची संख्या मोठी आहे.कागदोपत्री फरार असलेले हे आरोपी उजळमाथ्याने तालुक्यात वावरत आहेत.याला राजकीय व खाकीचाही आशिर्वाद कधी कधी कारणीभूत असतो.परंतु आता फरार आरोपींची वरात निघण्यास सुरूवात झाली आहे. जामखेडचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी आता फरार आरोपींच्या शोधासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे. मंगळवारी या पथकाच्या कारवाईत सहा विविध गंभीर गुन्ह्यातील सात आरोपींच्या जामखेड पोलिसांनी मुसक्या आवळण्याची धडक कारवाई केली.
जामखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत मनोज हाळनोर, त्रिंबक गोपाळघरे दोघे रा मोहरी; महालिंग मोहिते रा, पिंपळगाव आळवा,अश्विनी सोमेश्वर सोरटे रा.वाकी, बळीराम वाघमारे रा.देवदैठण,व नंदकिशोर खरात व दादासाहेब खरात अश्या सात फरार आरोपींना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील करण्यात आली. कारवाईच्या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर,हेड काँस्टेबल संजय लाटे,पोलिस काँस्टेबल संग्राम जाधव,विजयकुमार कोळी,आबासाहेब आवारे, अरूण पवार,संदिप आजबे,संदिप राऊत,सह आदींचा समावेश आहे.दरम्यान फरार आरोपींच्या शोधाची मोहीम आता वेगाने राबवली जाणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.