जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अनेक राज्यात अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र देशातील अनेक राज्य अजुनही सावध पाऊले टाकत आहेत.त्याच अनुषंगाने गोवा राज्यानेही पर्यटन सुरु करण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येणाऱ्या काळात तुम्ही पर्यटनासाठी गोव्यात जाण्याचा विचार करत असलात तर थोडं थांबा, कारण पुढील काही दिवस गोव्यातील पर्यटन बंदच असणार आहेत. याबाबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ( Corona closes tourism in Goa)
गोव्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. लॉकडाउनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसिकांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्टीकरण दिले. (Corona closes tourism in Goa)
गोव्यात सध्या ४०४४ सक्रिय करोना रुग्ण आहेत. तर १,५६,३४५ रुग्ण बरे झाले असून २९६० मृत्यूची नोंद झाली आहे. दुसरीकडे, ६,०१,९१२ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर त्यापैकी ९९,५४८ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
राज्यातील प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तीला करोनावरील लसीचा कमीतकमी एक डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन पुन्हा सुरू होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट करत ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “जोपर्यंत आम्ही राज्यभर लसीचा पहिला डोस देत नाही तोपर्यंत येथे पर्यटन सुरू होणार नाही. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते उद्दीष्ट साध्य झाल्यावरच आम्ही पर्यटन पुन्हा सुरु करण्याचा विचार करू,” असे सावंत म्हणाले.