Rohit patil news live : रोहित पाटलांनी गाजवले सभागृहातील पहिलेच भाषण, रोहित पाटलांनी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खळखळून हसले !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Rohit patil news live : वयाच्या २५ व्या वर्षी, देशाच्या राजकारणातील सर्वात तरूण आमदार म्हणून निवडून आलेल्या रोहित आर आर पाटील (Rohit R R Patil) यांना विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज पहिल्यांदा भाषण करण्याची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत रोहित पाटील (Rohit Patil NCP) यांनी सभागृहातील पहिलेच भाषण चांगलेच गाजवले. रोहित पाटलांच्या (Rohit Patil Aamdar) सहा मिनिटांच्या या भाषणामुळे सभागृहाला स्वर्गीय आर आर पाटील यांची आठवण झाली. रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एका ओळीचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगलेच लक्ष वेधले. अंभगातील ओळ ऐकताच देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरता आलं नाही.
विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपा आमदार राहूल नार्वेकर यांची बिनविरोध निवड पार पडली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.त्यानंतर सभागृहात नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर बोलण्याची संधी रोहित पाटील यांना मिळाली. पहिल्यांदा निवडून आलेल्या रोहित पाटील यांनी सहा मिनिटांचे दमदार भाषण करत सभागृह गाजवले. आर आर आबांच्या भाषणाची लकब रोहित पाटलांच्या आजच्या भाषणातून स्पष्टपणे दिसून येत होती. यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबर यांचे आभार मानले तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
अध्यक्ष महोदय आपण जसा सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून मान पटकावला आहे, तसाच मी सर्वात कमी वयाचा विधानसभा सदस्य म्हणून मान पटकावला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून सर्वात तरुण सदस्याकडे तुमचं बारीक लक्ष असेल, अशी विनंती करतो. तसेच माझ्यावर लक्ष असावं यासाठी दुसरं कारण म्हणजे तुम्ही निष्णात वकील आहात आणि मी देखील वकीलीचं शिक्षण पूर्ण करत आहे. एक नंबरच्या बाकावरील वकिलाकडे (देवेंद्र फडणवीस) जसं तुमचं लक्ष असतं, तसं याही वकिलावर लक्ष असू द्या अशीही विनंती मी तुमच्याकडे करतो, असं रोहित पाटील यांनी म्हटलं.
भाषणाच्या सुरुवातीला रोहित पाटील यांनी म्हटलं की, देशाने अनेक शाह्या पाहिल्या आहेत. मात्र लोकशाही अत्यंत महत्त्वाची शाही आपल्या वाट्याला आली. त्यामुळे आपला देश वेगळेपण टीकवू शकला. संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला वेगळं महत्त्व आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या एकमताच्या अधिकाराने इथे सर्व सन्माननीय सदस्य बसले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील यांनी संत तुकारामांच्या अभंगाचा उल्लेख केला. रोहित पाटील यांनी भाषणात म्हटलं की, संत तुकारामांच्या वाणीतून अभंग आला आहे, “अमृताहूनि गोड तुझे नाम देवा.” संतांच्या वाणीतून देखील आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला देखील गोड पद्धतीच वागणून द्याल, अशी विनंती आपल्याला करतो. पुराणामध्ये देखील अमृताला वेगळे महत्व होतं आणि आजही वेगळं महत्त्व आहे, असं देखील रोहित पाटलांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हसू आवरलं नाही.