आमदार निलेश लंके यांचे घर पाहून शरद पवार झाले अवाक्

लाकडी कपाटाला प्लॅस्टिक खुर्ची टेकवून शरद पवारांची बैठक!

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं तर मोठा बंगला, बंगल्यात महागडी सजावट, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर पाहिल्यावर भल्या भल्यांच्या तोंडात बोट गेल्याशिवाय राहणार नाही असेच चित्र शनिवारी समोर आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज शनिवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कार्यक्रम आटोपून शरद पवार हे पुण्याकडे परतत असताना त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या घरी भेट दिली.

साधारणता: लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं की नजरेत भरणार बंगला आणि त्याचा रूबाब सर्वांच्याच परिचयाचा आहे. पण लंके यांच्या घरी जेव्हा शरद पवारांनी भेट दिली तेव्हा आमदार निलेश लंके यांचं अत्यंत साधं पत्र्याचं घर असल्याचं समोर आलं. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना पाहून शरद पवारांसह सर्वच उपस्थितीत अवाक् झाले.

दरम्यान देशाचे नेते शरद पवार हे आमदार निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले.त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकून ही खुर्ची ठेवली. मागच्या भिंतीला गुलाबी रंग होता. गुळगुळीत आणि चकचकीत बंगल्याच्या भिंती जशा असतात तसं चित्र अजिबात नव्हतं. पवारांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे निलेश लंके यांचे आई-वडील बसले होते.

आमदार लंके यांच्या छोटेखानी घरात राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांसोबत अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले. राज्यातील भारदस्त नेते छोट्या घरात आल्यानंतर, लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे आज जरी आमदार झाले असले तरी ते आजही एका छोट्याशा घरात कुटूंबासोबत राहतात.एक छोटंस किचन आणि एक रूम, त्यातच बाथरूम असं लंके यांचं घर आहे. अनेकांना याचं नवल वाटतं. विशेष म्हणजे लंके यांचं एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्या परिवारात आईवडील, भाऊ- भावजय, पुतण्या-पुतणी, दोन मुले, आणि पत्नी असं 9 जण राहतात. आमदार निलेश लंके यांच्या कुटुंबाचा साधेपणा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे.

राज्याच्या राजकारणात साध्याल्या साध्या माणसाला ताकद देऊन मोठं करणं ही शरद पवारांच्या राजकारणाची आजवरची खासियत राहिलेली आहे. आमदार निलेश लंके यांच्या रूपाने शरद पवारांनी पुन्हा एकदा एका कार्यकर्त्याला राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याची किमया केली आहे.