Ajinkya Ram Shinde : अजिंक्य राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यास चोंडीत लोटला हजारोंचा जनसागर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर गावागावात आकडेमोडीला वेग आला आहे. कुणाला लीड मिळणार ? कोणाची पिछेहाट होणार? यावर जोरदार चर्चा झडत आहेत. दाव्या-प्रतिदाव्यांनी निकालाची उत्सुकता वाढवली आहे.परंतू गुरुवारी सायंकाळी आमदार प्रा राम शिंदे यांचे चिरंजीव अजिंक्य शिंदे यांच्या वाढदिवस सोहळा व दिवाळी फराळ कार्यक्रमास चोंडी गावात लोटलेला हजारोंचा जनसागर 23 रोजीचा निकाल काय असणार याचेच चुणूक दाखवणारा ठरला.चोंडीत मतदारसंघातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत गुलाल भाजपच उधळणार यावर शिक्कामोर्तब केले. गुरुवारी सायंकाळी चोंडीत झालेल्या अलोट गर्दीची चर्चा राज्यात रंगली आहे.
आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडून दरवर्षी दिवाळीनिमित्त दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता असल्याने दिवाळी फराळाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. मतदानाच्या दुसर्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी आमदार राम शिंदे यांचे चिरंजीव अजिंक्य शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यासाठी मतदारसंघातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली. सर्व नागरिकांनी अजिंक्य शिंदे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला.
गुरुवारी सायंकाळी चोंडी पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेली होती.चोंडी ग्रामस्थांनी अजिंक्य शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास मतदारसंघातून आलेल्या हजारो नागरिकांचे आमदार प्रा राम शिंदे, माजी सभापती आशाताई शिंदे, आई भामाबाई शिंदे व शिंदे कुटूंबियांनी स्वागत केले.
यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अजिंक्य शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राम शिंदे यांचे जावई तथा आएएस अधिकारी श्रीकांत खांडेकर, मुलगी डाॅ अक्षता शिंदे (खांडेकर) लहान कन्या अन्विता शिंदे तसेच शिंदे कुटूंबातील सर्व सदस्य त्याचबरोबर महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत अजिंक्य शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आमदार प्रा राम, माजी सभापती आशाताई शिंदे व बड्डे बाॅय अजिंक्य शिंदे यांच्यासमवेत फोटो काढण्यासाठी नागरिकांची व कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. निकालाच्या दोन दिवस आधीच चोंडीत रंगलेल्या या सोहळ्यावेळी आमदार प्रा राम शिंदे यांचा मुड विजयाच्या आत्मविश्वासाने भरलेला दिसत होता. त्यांच्या चेहर्यावरील हास्य बरेच काही सांगुन जात होते. मतदारसंघातील प्रत्येक गावातून आलेल्या नागरिकांसह कार्यकर्त्यांचाही उत्साह खूप काही सांगून जात होता. चोंडीत रात्री उशिरापर्यंत दिवाळी फराळ कार्यक्रम सुरु होता.
दरवर्षी प्रमाणे दिवाळी फराळाचा कार्यक्रम आचारसंहितेमुळे आपल्याला करता आला नव्हता. आज अजिंक्य च्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिवाळी फराळाचा कार्यक्रम आनंदात पार पडला. मतदारसंघातील नागरिकांनी हजारोच्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती लावली. जनतेने दाखवलेले या प्रेमाची उतराई करणे कदापी शक्य नाही, आजचे हे हास्य फक्त तुमच्यामुळे आहे,अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.