WhatsApp Wedding Card Scams : व्हाॅट्सअपवर लग्नपत्रिका आली असेल तर सावधान; कारण वाचून बसेल जोरदार धक्का !
WhatsApp Wedding Card Scams : पुर्वी घरात एखादे लग्न निघाले की, पै पाहुणे, नातेवाईक व मित्रपरिवार यांना घरोघरी जाऊन पत्रिका द्यावी लागायची. लग्न पत्रिका घरपोहच करण्यासाठी कुटूंबातील जबाबदार व्यक्तीती लग्नपत्रिका वाटपासाठी मोठी दमछाक व्हायची. परंतू काळ बदलला, नवे तंत्रज्ञान आले, डिजीटल युगात WhatsApp द्वारे लग्नपत्रिका पाठवण्याचा ट्रेंड आला. हीच पध्दत रूढ झाली आहे. पण WhatsApp वर येणारी हीच लग्न पत्रिका तुमच्या आर्थिक लुटीचं कारण ठरू लागली आहे. हे वाचून तुम्हाला धक्का बसला ना ? चला तर मग जाणून घेऊयात या नव्या सायबर लुटीविषयी !
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या आयडिया वापरून ऑनलाईन आर्थिक लुटीचा खेळ खेळत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार रोजच उघडकीस येत आहेत. विशेषता: मी अमूक बँकेतून बोलतोय, तुमचं अकाऊंट बंद होईल, खातं सुरू ठेवायचं असेल तर अमूक माहिती द्या, अशी भिती दाखवून बँक खात्याची माहिती मिळवली जायची, त्यातून आर्थिक लूट केली जायची, पण आता याच सायबर भामट्यांनी आर्थिक लुटीसाठी नवी आयडिया शोधून काढली आहे. यात लग्नाची पत्रिका हे महत्वाचं कारण ठरू लागली आहे. सायबर गुन्हेगारांकडून आपल्या मोबाईलवर APK फाईलच्या स्वरूपात लग्नाची पत्रिका पाठवली जाते, ती फाईल उघडताच आपला मोबाईल हॅक होतो, त्यानंतर मग सुरू होतो आर्थिक लुटीचा डाव. नेमकं काय घडतं जाणून घेऊयात.
WhatsApp वर लग्नपत्रिका आल्यावर नेमकं काय घडतं ?
- सायबर भामटे अनोळखी नंबरवरुन तुम्हाला डिजीटल लग्नपत्रिका पाठवतात,
- ही लग्नपत्रिका APK फॉरमॅटमध्ये असते.
- उत्सुकतेपोटी आपण लग्नपत्रिका उघडतो.
- लग्नपत्रिकेच्या नावाखाली आलेला व्हायरस आपल्या मोबाईलमध्ये शिरतो
- काही वेळात आपला मोबाईल बंद पडतो.
- आपण पुन्हा फोन सुरु करतो तोपर्यंत मोबाईलमधील सगळ्या सेटिंग्ज बिघडलेल्या असतात.
- सायबर दरोडेखोर तुमची मॅसेजिंग सिस्टिम हॅक करतात
- तुमच्या गुगल पे, फोन पे या पेमेंट अॅपचाही ताबा घेतात
- इन्स्टाग्राम, फेसबुक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे पासवर्ड मिळवले जातात
- फोटो गॅलरीतले फोटोही सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात
- मोबाईलमध्ये सेव्ह केलेल्या आधार कार्ड पॅनकार्डचाही गैरवापर केला जातो
सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातल्या काही रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात. तुमचं बँक अकाऊंट रिकामं केलं जातंच शिवाय तुमच्या गुगल पे आणि फोन पे वरुन ऑनलाईन खरेदीही केली जाते. ऑनलाईन क्रेडिट कार्डाचा वापर परदेशात खरेदी करण्यासाठी वापरला जातो. याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही. कारण खरेदीचे अलर्ट देणारी मॅसेजिंग यंत्रणाही त्यांनी ताब्यात घेतलेली असते. एका लग्नाच्या पत्रिकेनं तुम्हाला कंगाल केलेलं असतं.
एकट्या नागपुरात अशा सायबर लुटीच्या अनेक घटना समोर आल्यात. त्यामुळं अजाणतेपणी अशी लग्नपत्रिका उघडल्यास तातडीनं जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा 1930 या सायबर गुन्ह्यांसंदर्भातल्या तक्रारींसाठीच्या सायबर हेल्पलाईनला कॉल करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.
मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन आलेली लग्नपत्रिका उघडू नका. एपीके फॉरमॅटमधील फाईल उघडण्याचा विचारच करु नका. एखाद्या मित्राची नातेवाईकाच्या नावे लग्नपत्रिका आल्यास पहिल्यांदा फोन करुन खात्री करुन घ्या. अन्यथा मित्र आणि नातेवाईकाच्या लग्नाच्या आनंदात तुम्ही कंगाल व्हाल… त्यामुळं सावधान रहा !