जामखेड टाईम्स वृत्तसेवा ( सत्तार शेख) रेखा हे नाव जामखेड शहरातच नव्हे तर अवघ्या जामखेड तालुक्याला परिचित आहे. रेखा ही भोळसर तरूणी. गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरात वास्तव्यास आहे. शहरात रोज भटकंती करत असते. अनेक मानवतावादी लोक तिला मानवतेच्या नात्याने जपतात. खायला देतात किंवा पैसेही देतात. तीने आजवर कधीच कुणाला त्रास दिला नाही. मात्र तिचा मळकट पेहराव पाहून काही टुकार तिला अधुनमधून त्रास देतात. चेष्ठा करतात परंतु ती कधीच आक्रमक होत नाही. ती सर्वांशी हसुन खेळून असते. एकदा का रेखाची कुणीशी गट्टी जमली की ती मग तो ओळखीचा चेहरा दिसला की ती आवर्जून त्याच्या जवळ जाणार. हक्काने पाठीवर फटका मारणार. त्याच्याशी संवाद करणार. अन पुढे निघून जाणार. रेखी ही काहीशी मळकट दुर्गंधीयुक्त पेहरावात वावरत असली तरी तिची किळस करणारे तसे नाममात्रच कारण रेखाचा मनमिळावू स्वभाव.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही रेखावर का लिहत आहोत ? हे जाणून घेण्याआधी काहीशी पार्श्वभूमी समजून घेऊयात . मुद्दा असा आहे की, सध्या कोरोनाची दुसरी लाट येऊन याकरिता प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्याच्या सर्वच भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. विनामास्क फिरणार्या, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणार्याविरोधात कारवाया केल्या जात आहेत. मग तुम्ही म्हणाल यात रेखाचा काय संबंध ?? प्रशासन कारवाई करतयं हे तर आम्हाला माहित आहे पण रेखाचा अन त्या कोरोना उपाययोजनांचा काय संबंध ?
थांबा; पुढे याचा उलगडा होणारच आहे. तर झाले असे की, कोरोना उपायोजनांसाठी पोलिस प्रशासनाने विनामास्क शहरात फिरताना आढळणार्यांविरोधात तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणार्याविरोधात याशिवाय सार्वजनिक जागी थुंकणार्यांविरोधात मागील आठवडाभरापासून कारवाई हाती घेतलेली आहे. ही कारवाई सुरू असतानाच जामखेड पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या आविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, विजयकुमार कोळी, सचिन राऊत यांची नजर रेखावर गेली. रेखा सतत शहरात फिरत असते. तीला तर कोरोना होऊच नये पण चुकून तिच्या माध्यमांतून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता गुप्तवार्ता विभागाचे अविनाश ढेरे यांनी तातडीने रेखाची भेट घेत तिला नवा मास्क घेऊन दिला. व तो मास्क रोज घालायचा याविषयी तिला समजून सांगितले. परंतु रेखा मास्क घालून सार्वजनिक ठिकाणी वावरेल का? याबाबत आविनाश ढेरे व त्यांच्या सहकारी मित्रांना साशंकता होती.
पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकातील कर्मचारी शनिवारी आठवडे बाजारात मास्कविरोधी कारवाया करत असताना या कर्मचार्यांना शनिवारी दुपारी मोठा आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क रेखा मास्क घालून शहरात फिरत होती. पोलिसांना पाहून रेखा त्यांच्या जवळ आली अन म्हणाली दादा बघ मी पण मास्क घातलाय. काही लोकं मास्क का घालतं नसतील ? हे ऐकून सर्वच पोलिस कर्मचारी स्तब्ध झाले. भोळसर असलेल्या रेखाच्या तोंडून निघालेल्या वाक्यांनी मात्र पोलिस बांधवांच्या काहूर माजवले.
भोळसर असलेल्या रेखाला जे समजले ते तुम्हा आम्हा सर्वच जामखेडकरांना समजेल काय ? हा सवाल मात्र आता उपस्थित झाला आहे. कोरोनापासुन संरक्षण व्हावे याकरिता मास्क वापरणे किती गरजेचे आहे याचाच कृतीशील धडा रेखाने समस्त जामखेडकरांना शिकवत बेफिकीर जामखेडकरांच्या डोळ्यात मात्र झणझणीत अंजन घातले आहे हे मात्र खरे.
जामखेड शहर व तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय होऊ नये याकरिता प्रत्येक नागरिकाने आता नैतिकपणे मास्कचा वापर करणे आवश्यक आहे हाच धडा रेखाने घालून दिलाय. रेखाच्या कोरोनाविरोधी कृतीला जामखेडकर साथ देतील का ? बेफिकीरीचा कळस गाठतील ? हे पाहणे मात्र आता रंजक ठरणार आहे.
रेखाने केलेली कृती छोटी व दुर्लक्षित करणारी आहे असे जरी तुमच्या मनात येत असेल तर सावधान कारण माणुस असण्याचे अस्तित्वच आपण त्याक्षणी गमावलेले असेल हे मात्र पक्क ध्यान्यात घ्या !
रेखाच्या कृतीला जामखेड टाईम्सचा सलाम !