Heavy Snowfall | पाकिस्तानात जोरदार बर्फवृष्टीमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहने रस्त्यात अडकले,10 मुलांसह 21 ठार
इस्लामाबाद । वृत्तसंस्था । पाकिस्तानातील पंजाबच्या मुरी येथील डोंगराळ भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे 1000 हून अधिक पर्यटक वाहने रस्त्यांच्या मधोमध अडकले आहेत.भयंकर हिमवृष्टीमुळे वाहनांमध्ये अडकलेल्या 10 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 10 जणांचा कारमध्ये ऑक्सिजन न मिळाल्याने बसलेल्या अवस्थेत गोठून मृत्यू झाला आहे असे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे. (1000 vehicles stranded in heavy snowfall,21 killed, including 10 children in pakisathan)
पाकिस्तानमधील मुरी भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टी मुळे रस्त्यात अडकून पडलेल्या हजारो वाहनांचे व्हिडीओ तसेच कारमध्ये बसून मृत्यूमुखी पडलेल्यांचा वेदनादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यासोबतच या परिस्थितीशी झुंजणाऱ्या पर्यटकांचे व्हिडिओ आणि फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
आपत्कालीन बचाव सेवा 1122 ने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी आणि 6 मुलांचाही समावेश आहे. आणखी एका कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याचीही बातमी आहे. उस्मान अब्बासी या पर्यटकाने फोनवर सांगितले की, लोकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. सर्व पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी आले होते, मात्र शनिवारी परतत असताना भयंकर हिमवर्षामुळे ही वाहने रस्त्यातच अडकले आहेत असे वृत्तात म्हटले आहे. या घटनेला पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनीही दुजोरा दिला आहे.
रावळपिंडीच्या उपायुक्तांनी सोशल मीडियावर 23,000 वाहनांमधून लोकांची सुटका केल्याची माहिती दिली आहे. या भागात अजूनही 1000 वाहने अडकली आहेत असे सांगण्यात येत आहे. डीएसपी मुरी यांनीही व्हिडिओ संदेशात सांगितले की, आतापर्यंत 4 फूट बर्फवृष्टी झाली असून शेकडो झाडे पडल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत.
मुरी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या उत्तरेस स्थित असून समुद्रसपाटीपासून सुमारे 7500 फूट उंचीवर वसलेले एक छोटेसे पर्यटन स्थळ आहे. 19व्या शतकात ब्रिटीश सैन्याने त्याचा वैद्यकीय तळ म्हणून वापर केला. डोंगराळ भाग असल्याने पर्यटकांचे प्राण वाचवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर बचावकार्यात गुंतले आहे. मात्र त्यांनाही बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर थंडीशी झुंज देत असलेल्या पर्यटकांना कारमधून सरकारी इमारती आणि शाळांमध्ये हलवण्यात आले आहे. जिथे स्थानिक जनतेच्या मदतीने त्यांना ब्लँकेट आणि अन्न पुरविण्यात आले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बर्फवृष्टीमुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने धक्का बसल्याचे म्हटले आहे. इम्रान सोशल मीडियावर म्हणाले – वाईट हवामान आणि भयंकर बर्फवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटकांच्या आगमनाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाची पुरेशी तयारी नव्हती. त्याची पडताळणी केली जात आहे.