New Corona variant B.1.1.529 । भारतीयांनो सावधान | आफ्रिकेत आढळून आला डेल्टापेक्षा खतरनाक कोरोना व्हेरिएंट, जगाची झोप उडाली 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : संपुर्ण जगाची झोप उडवणारी एक बातमी आता आफ्रिकेतून समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा (Corona virus) एक नवीन प्रकार (New Corona variant B.1.1.529) आढळून आला आहे. यातून कोरोनाचा वेगाने प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोना थंडावलेला असला तरी भारतीय नागरिकांनी आता सावध होण्याची आवश्यकता आहे.

गेल्या दोन वर्षांपासून संपुर्ण जगात कोरोनाने मोठा धुमाकुळ घातला आहे. जगात कोरोनाने लाखो बळी घेतले आहेत. कोरोना सतत रूप बदलत असल्याने तो अधिक धोकादायक ठरत आहे. जगभरात कोरोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटने मोठा धुमाकुळ घातला होता. आता नवा व्हेरिएंट सापडल्याने तोही जगभरात मोठा धुमाकुळ घालतो शकतो यामुळे जगाच्या चिंता वाढल्या आहेत.

आफ्रिकेत आढळून आलेल्या New Corona variant B.1.1.529  या व्हेरिएंटची 22 रुग्णांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. इंपीरियल कॉलेज लंडनचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. टॉम पीकॉक (Dr. Tom Peacock) यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर खात्यावर विषाणूच्या नवीन प्रकाराविषयी माहिती पोस्ट केली (b.1.1.529) होती. तेव्हापासून शास्त्रज्ञ या प्रकाराचा शोध घेत आहेत.हा नवीन प्रकार कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक रिस्पॉन्स अँड इनोव्हेशनचे संचालक प्रोफेसर तुलिओ डी ऑलिव्हिरा म्हणाले, ‘हा एक अतिशय वेगळ्या प्रकारचा उत्परिवर्ती विषाणू आहे, जो वेगाने पसरू शकतो. या विषाणू प्रकारामुळे पुन्हा भीतीदायक वातावरण तयार झाले असून त्याची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. अहवालानुसार, 30 हून अधिक उत्परिवर्तनांसह एक नवीन कोविड प्रकार दक्षिण आफ्रिकेत पसरत आहे.

दरम्यान, ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सहा आफ्रिकन देशांची उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, या देशांना रेड लिस्टमध्ये समाविष्ट केले जाईल. तसेच, ब्रिटनमधील प्रवाशांना क्वारंटाईन करावे लागेल.

दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगला पोहोचलेल्या लोकांमध्येही या प्रकाराचा संसर्ग आढळून आला आहे. नवीन प्रकार प्रथम रीगल विमानतळ हॉटेलमध्ये थांबलेल्या दोन लोकांमध्ये आढळून आला. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन (CHP) नुसार, तपासात असे दिसून आले आहे की दोन्ही प्रकरणे B.1.1 ची आहेत. पहिल्या व्यक्तीने एअर व्हॉल्व्ह असलेला मास्क घातला होता आणि या मास्कमुळेच दुसऱ्या व्यक्तीमध्ये विषाणूचा संसर्ग झाला होता.

भारतात नव्या कोरोना व्हेरिएंटचा एकही रूग्ण नाही

भारतातील सर्व विमानतळांना हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने राज्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यास राज्यांना सांगण्यात आले आहे. मात्र, भारतात याबाबत कोणताही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नसून भारतात अद्याप या व्हेरिएंटचे रुग्ण सापडलेले नाहीत.