जामखेड : प्रभाग 12 मधील सांडपाण्याच्या समस्येने नागरिक त्रस्त, नगरपरिषदेचे दुर्लक्ष, भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषीकेश मोरेंनी वेधले जामखेड नगरपरिषदेचे लक्ष
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील प्रभाग 12 मधील लोकमान्य शाळेजवळील घरकुल परिसरातील शेतात सांडपाणी साचून मोठे तळे निर्माण झाले आहे. या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात साचलेल्या सांडपाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी व या भागात अंडर ग्राऊंड गटार बांधावी यासाठी भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषीकेश राजेश मोरे यांनी शिष्टमंडळासह जामखेड नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी गंगाराम तळपाडे यांची नुकतीच भेट घेतली आणि निवेदन देत सदर समस्येकडे लक्ष वेधले आहे.
जामखेड शहरातील प्रभाग 12 मधील गोडाऊन गल्ली परिसरात नगरपरिषदेच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लोकमान्य शाळा ते धोत्री नाला या भागात 200 मीटरचे गटारीचे काम मंजुर करण्यात आले होते.परंतू अर्धवट निधीमुळे सदरचे काम अर्धवट राहिले आहे. या भागात अंदाजे 100 ते 110 मीटर काम पुर्ण झाले आहे. घरकुल परिसरापर्यंत सदरचे काम झाले. पुढे या भागातील गटारीचे पाणी घरकुल परिसरातील शेतात साचून मोठे तळे निर्माण झाले आहे. यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे जामखेड नगरपरिषदेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
दरम्यान, जामखेड नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी गंगाराम तळपाडे हे काल 28 फेब्रुवारी 2023 रोजी जामखेड दौऱ्यावर आले होते. यावेळी भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषीकेश राजेश मोरे यांनी निखिल राळेभात,अक्षय राळेभात, सचिन म्हेत्रे, पांडुरंग म्हेत्रे, गणेश राळेभात, अक्षय जाधव, राजू राळेभात, योगेश हुलगुंडे, प्रसाद होशिंग,अरुणा पांडुरंग म्हेत्रे, माऊली राळेभात,जयश्री गणेश राळेभात, सुशिला दिलीप निमोणकर सह आदींच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सदर समस्येकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.