जामखेडमधील दिव्यांग बांधवांचे शासकीय अनुदान रखडले, दिव्यांग बांधवांना तातडीने न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शासनाच्या संजय गांधी योजनेतून दिव्यांगांना दरमहा दिला जाणारा पगार (शासकीय अनुदान) रखडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जामखेड तालुक्यातील दिव्यांग बांधव शासकीय अनुदानापासून वंचित आहेत. या प्रश्नाकडे दिव्यांग बांधवांनी जामखेड महसूल विभाग व नगरपरिषद प्रशासनाचे आज 4 रोजी निवेदनाद्वारे लक्ष वेधले. संजय गांधी योजनेतून दिले जाणारे पगार दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात तातडीने जमा न झाल्यास येत्या 16 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांसह आज 4 ऑक्टोबर 2023 रोजी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे व जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची भेट घेतली. दिव्यांग बांधव शासनाच्या संजय गांधी योजनेच्या अनुदानापासून गेल्या तीन महिन्यांपासून वंचित असल्याची बाब त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सदर गंभीर बाबीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा, अन्यथा 16 ऑक्टोबर 2023 पासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष नय्युम भाई सुभेदार, जामखेड शहर अध्यक्ष दिनेश भाऊ राळेभात, जवळा गट अध्यक्ष राहुल भालेराव,दिव्यांग सेल अध्यक्ष सचिन उगले, संजय मोरे, सोहेल तांबोळी, सचिन जाधव, सुरज खैरे, काकासाहेब शिंदे, सरफराज तांबोळी,
अशोक वस्तरे, एकनाथ उगले, आशा चौगुले, सुशीला चव्हाण, सुनिता शेगर सह आदी दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते.