जामखेड बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देणाऱ्या व्यापाऱ्यांचे आभार ! …अन्यथा अंदुरे कुटुंब उपोषण करणार – व्यापारी सागर अंदुरे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अंदुरे कुटूंबावरील हल्ला प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी जामखेड शहरातील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या जामखेड बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. छोट्या – मोठ्या व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत जामखेड बंदला पाठिंबा दिला. जामखेड शहरात दहशत आणि दडपशाही करणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांविरोधात जामखेडमधील व्यापारी एकवटल्याचे या बंदच्या माध्यमांतून समोर आले.
जामखेड बंदला पाठबळ देणाऱ्या जामखेडमधील व्यापाऱ्यांचे सावळेश्वर उद्योग समुहाचे संचालक रमेश (दादा) आजबे आणि शितल कलेक्शनचे संचालक सागर अंदुरे यांनी अभार मानले. तसेच जामखेड बंदचे अंदोलन करूनही जर आरोपींना पोलिसांकडुन अटक न झाल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाचे अंदोलन करण्याचा इशारा व्यापारी सागर आंदुरे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.
अंदुरे कुटूंब हल्ला प्रकरणाचा गुन्हा दाखल होऊन महिना लोटला आहे, या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. आरोपींना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी जामखेडमधील व्यापाऱ्यांनी बुधवारी 7 डिसेंबर रोजी जामखेड बंदची हाक दिली होती. या बंदला दुपारपर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. बंद हाणून पाडण्यासाठी विशिष्ट यंत्रणा सकाळपासून कार्यरत होती. तरीदेखील जामखेड बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. सोशल मिडीयावर काही जणांनी बंद विरोधात रान पेटवले होते.
एक महीन्यापुर्वी शहरातील अंदुरे कुटूंबीयांवर हल्ला करुन फरार झालेल्या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी यासाठी एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी दि ६ रोजी जामखेड बंद बाबत तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आज दि ७ रोजी जामखेड शहरात व्यापाऱ्यांकडुन पुकारण्यात आलेल्या जामखेड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळ पासूनच शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. दुपारनंतर काही छोट्या तर काही बड्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली. परंतू जामखेड बंद असल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांनी पाठ फिरवली होती. सायंकाळ पर्यंत संपूर्ण बाजारपेठ पुर्वपदावर आली होती.
जामखेड बंद मध्ये शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने या व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करताना सावळेश्वर उद्योग समुहाचे संचालक रमेश (दादा) आजबे म्हणाले की, जामखेड येथील व्यापाऱ्यांनी काल तहसीलदार यांना बंद बाबत निवेदन दिले व आपली दुकाने बंद ठेऊन आजच्या जामखेड बंदला पाठींबा दिला. शहरातील व्यापाऱ्यांना ब्लॉकमेल केले जात आहे. पैशाची मागणी केली जात आहे. आज जामखेड बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी अंदुरे कुटूंबाला न्याय देण्याचे काम केले आहे. कारण जामखेड ची बाजारपेठ मोठी आहे आणि ती टिकली पाहिजे असे म्हणत आजबे यांनी व्यापाऱ्यांचे अभार मानले.
व्यापारी सागर आंदुरे म्हणाले की, जामखेड बंदसाठी शहरात कुणावरही दबाव टाकला नाही अथवा रॅली काढली नाही, फक्त बंदचे अव्हान केले होते. त्याला व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन आम्हाला पाठिंबा दिला त्या बद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच मारहाण करणार्या आरोपींना एक दिवस जामखेड बंद ठेऊन ही पोलिसांकडुन अटक झाली नाही तर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही सागर आंदुरे व त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.