जामखेड टाइम्स वृत्तसेवा | जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती भागातील एका गटारीचे दुर्गंधीयुक्त दुषित पाणी नागरी भागात साठत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांबाबत सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद हे गेल्या सहा महिन्यांपासून नगरपरिषदेचे लक्ष वेधत आहेत. परंतू हा प्रश्न निकाली न निघाल्यामुळे सय्यद येत्या १५ सप्टेंबर २०२२ रोजी जामखेड नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत, तसा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेड नगरपरिषद हद्दीतील सदाफुलेनगर भागातील गुप्ता यांच्या घरापासून पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीपर्यंत काॅंक्रीट रस्ता व भुमीगत गटर आहे.सदरील गटरीचे पुढचे तोंड काही शेतकऱ्यांनी अडवले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून गटारीतील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे १० ते १२ गल्ल्यांचे दुषीत पाणी जावेदभाई मुजावर यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत जमा होऊन त्या भागात दलदलयुक्त डबके तयार झाले आहे. आणि याच डबक्यामध्ये कुत्री, डुकरं, व इतर जनावरे लोळतात तसेच पाणी सडल्याने परीसरात दुर्गंधी पसरली आहे.
गटारीचे पाणी साठल्याने मच्छरांचा उच्छाद वाढला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरातील लहान मुले व नागरीक मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. सदाफुलेवस्तीवरील या गंभीर प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद यांनी जामखेड नगरपरिषदेचे वेळोवेळी लक्ष वेधले, परंतु सहा महिने झाले सदर गटारीचा प्रश्न मार्गी लागला नाही.
नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचा असलेला प्रश्न सहा महिन्यांपासून निकाली न निघाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद हे आता आक्रमक झाले आहेत. येत्या १५ सप्टेंबर २०२२ रोजी सय्यद हे आपल्या समर्थकांसह जामखेड नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी ३० ऑगस्ट २०२२ रोजी जामखेड नगरपरिषदेला दिले आहे.
दरम्यान या प्रश्नांबाबत जामखेड टाइम्सशी बोलताना जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले की, सदाफुलेवस्ती भागातील पाण्याच्या टाकीच्या भागातील नगरपरिषद हद्दीपर्यंत गटारीचे आणि चेंबरचे काम एक वर्षापुर्वी पुर्ण झाले आहे. पण पुढे वक्फबोर्डाची जागा आहे. संबंधित वहिवाटदार पुढे काम करुन देत नाही. अनेकदा त्यांना विनंत्या केल्या पण त्यांचा सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यामुळे पुढील काम अपुर्ण आहे. पण लवकरच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे दंडवते म्हणाले.