जामखेड शहर विकास आराखड्यात दिव्यांग बांधवांच्या घरांसाठी हक्काची जागा मिळावी – प्रहारचे शहराध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांची मागणी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहर विकास आराखड्यात दिव्यांग बांधवांच्या घरांसाठी हक्काची जागा आणि व्यवसायासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये राखीव कोटा असावा, तसेच गट क्रमांक 306 मधील शासकीय जागेत घरकुलांसाठी व तिथल्या स्थानिक लोकांना कायमस्वरूपी जागा मिळावी, अशी मागणी प्रहार संघटनेचे जामखेड शहराध्यक्ष नय्युमभाई सुभेदार यांनी केली आहे.
जामखेड नगरपरिषद प्रारूप विकास योजनेबाबत चर्चा करणेसाठी सहायक संचालक नगर रचना,अहमदनगर शाखा कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जामखेड पंचायत समिती सभागृह या ठिकाणी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम 1966 अन्वये जामखेड शहर विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करण्यासाठी सर्वसाधारण सभा ठराव क्र.19 दि.26/12/2018 नुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार विकास योजना तयार करण्यासाठी मंगळवारी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सुभेदार बोलत होते.
नगरपरिषद हद्दीत क्रिडा संकुलाचे काम रखडले आहे, त्याला तातडीने गती द्यावी, शहरातील अंतर्गत रस्त्यांची रुंदी वाढवावी, शहरातील झोपडपट्टी एरियात पोलीस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, शहराची पूर्वेकडे हद्दवाढ करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर इतरही अनेक मागण्या करण्यात आल्या.