जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या जामखेड शहरातील कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कामात अडथळा ठरणारे अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ होणार आहे. रस्त्याच्या कडेला असलेली झाडे हटविल्यानंतर आता पक्के अतिक्रमणे हटविले जाणार आहेत. येत्या सात दिवसांत स्वता:हून अतिक्रमणे काढावीत अशी नोटीस राष्ट्रीय महामार्ग विभागाने जारी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग 548 D चे जामखेड ते सौताडा या दरम्यान काम हाती घेण्यात आले आहे. बीड रोडवरील शासकीय दुध डेअरीपर्यंत रस्त्याची खोदाई पुर्ण झाली आहे. आता शहरातील कामास सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने शहरातील रस्त्यावर दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केली आहे. आज 1 मार्च 2023 रोजी सार्वजनिक सुचना फलकाद्वारे नोटीस जारी करण्यात आली आहे.
त्यात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग 548 D वरील जामखेड ते सौताडा या रस्त्याची शासकीय हद्द रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी 15 मीटर (50 फुट) अंतरापर्यंत आहे. रस्त्याच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण 7 दिवसांत (7 मार्च 2023 पर्यंत) काढून प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन करण्यात आले आहे.