महाराष्ट्राने जामखेडकरांचा आदर्श घ्यावा – रविकांत तुपकर, साऊ फाऊंडेशन आयोजित शिंदेशाही बाणा कार्यक्रमास नागरिकांचा तुफान प्रतिसाद !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । साऊ फाऊंडेशनच्या माध्यमांतून संध्याताई सोनवणे या तरूण कार्यकर्तीने आयोजित केलेला महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे.सामान्य घरातली पोरं जर का राजकारणाच्या दिशेनं पावलं टाकत असतील,त्यांच्या घरी राजकीय पार्श्वभूमी नसेल,अशी मंडळी एखाद्या क्षेत्रामध्ये धडपड करीत असेल तर अश्या मंडळींच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे, असे अवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.
युवा सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई सोनवणे यांच्या पुढाकारातून आणि साऊ फाऊंडेशन यांच्यावतीने जामखेड शहरात महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ‘शिंदेशाहीबाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आंबेडकर चळवळ ज्यांच्या लोकगीतांमधून बहरली अन् आजही तितक्याच जोशात ती जिवंत ठेवण्याचे कार्य करणारे महाराष्ट्राचे लोकगायक आनंदजी शिंदे यांच्या ‘शिंदेशाहीबाणा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने जामखेडकरांची मने जिंकली. हजारो नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. नेटके नियोजन अन उत्कृष्ट सादरीकरणाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास सर्वपक्षीय पदाधिकारी अन् कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे, पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा मधुकर (आबा) राळेभात, भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, वंचित बहुजन आघाडीचे अरूण जाधव, भाजप शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, नगरसेवक अमित चिंतामणी, जमीर बारूद, भाजपा प्रसिध्दी प्रमुख उध्दव हुलगुंडे, तुषार बोथरा, महेश सोनवणे सह आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना तुपकर म्हणाले की, जातीभेद नष्ट करण्यासाठी महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज आहे. एकिकडे काही लोक जातियतेचे आणि धर्मांधतेचे विष पेरण्याचे काम ताकदीने करतायेत, परंतू गावगाड्यातली सामान्य जनता महापुरुषांच्या जयंत्या एकत्र करून आम्ही सगळे एक आहोत असे सांगत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरूषांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांना कुण्या एका जातीत,धर्मात बंदिस्त करू नका, ते सर्वांचे आहेत.जामखेडमध्ये महामानवांची संयुक्त जयंती साजरी झाली. जामखेडकरांचा हाच आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात महामानवांची संयुक्त जयंती साजरी व्हावी असं मला वाटतं, अशी भावना यावेळी तुपकर यांनी व्यक्त केली.
वयाच्या 28 व्या वर्षी मला लाल दिवा मिळाला ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. त्याच लाल दिव्याला दीड दोन वर्षांत लाथ मारायची ताकद माझ्यामध्ये जर कोठून आली असेल तर ती बाबासाहेबांच्या विचारांमुळे आली. म्हणूनच बाबासाहेबांचा विचार सदैव जिवंत राहिला पाहिजे असे स्पष्ट मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमा संयोजिका संध्याताई सोनवणे यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सर्वांना पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी राजेंद्र फाळके, बीडीओ प्रकाश पोळ, मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साऊ फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. कार्यक्रम शांततेत पार पडला.