जामखेड टाइम्स वृत्तसेवा । “सूक्ष्म नियोजन, अभ्यासातील सातत्य व संयम हाच स्पर्धा परीक्षेतील यशाचा खरा मार्ग आहे, असे सांगत अभ्यास करताना येणाऱ्या अडचणींचे भांडवल न करता त्यावरती मात करून विजयाची गुढी उभारता यायला हवी,” असे प्रतिपादन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जामखेड शहरातील स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्रात एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ बोलत होते.
यावेळेस पोळ म्हणाले की, “यशाला कुठलाही शाॅर्टकट नसतो. यश मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रम समजून घेणे महत्वाचे आहे. त्याबरोबर आवश्यक पुस्तके, अभ्यासाचे नियोजन, प्रत्यक्ष परीक्षा देताना घ्यावयाची काळजी याबाबत पोळ यांनी सखोल मार्गदर्शन केले.”
यावेळी स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक सोमनाथ शिंदे, प्रा.कैलास वायकर प्रा.भारत पाटोळे, शिंदे बी. एस. सर मयूर भोसले सर, सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगद ढोरमारे यांनी केले व तर ऋतुजा डोंगरे यांनी आभार मानले.