यात्रेकरूंसाठी जामखेड शहरात ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारले जाणार, नगरपरीषदेकडून नागपंचमीची जय्यत तयारी सुरू
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात प्रसिध्द असलेली जामखेडची नागपंचमी यात्रा यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. यंदा यात्रेला मोठी गर्दी होणार असल्याने नगरपरिषद प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी हाती घेण्यात आली आहे. यात्रेला येणाऱ्या भाविक आणि नागरिकांसाठी शहरात ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेट उभारले जाणार आहेत अशी माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना दिली.
जामखेड शहरात यात्राकाळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांनी शहरात मोठ्या पार्किंगचे ठिकाणे निश्चित केले आहेत. तसेच नगरपरिषदेच्या वतीने शहरात 25 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमांतून यात्रेसाठी वेगाने नियोजन केले जात आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी ठिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अग्निशमन गाडी आणि रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. पालखी मार्गातील अडथळे दुर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेगाने राबवल्या जात असल्याची माहिती जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.
जामखेड नागपंचमी आनंद मेळाव्यात तिकीटाचे दर काय असणार ? यावर बोलताना मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते म्हणाले की, कर्जत यात्रेत वाढीव तिकीट दराचा मुद्दा गाजला होता, जामखेड यात्रेत तसा प्रकार होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणेच तिकीट दर आकारावेत जेणेकरून सामान्य माणसांना आनंद मेळाव्याचा आनंद लुटता येईल यासाठी आनंद मेळावा व्यवस्थापकांना तिकीट दराबाबत सुचना दिल्या आहेत. सरकारच्या करमणुक कर विभागाचे यावर बारकाईने लक्ष असणार आहे.
जामखेड शहरात यंदा होणाऱ्या नाग पंचमी उत्सवात पोलिस प्रशासनाच्या निगराणी वेगवेगळ्या ठिकाणी स्टेज देण्यात येणार आहेत, शहरात 25 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी नगर परिषदेच्या माध्यमांतून बॅरिगेट उभारण्यात येणार आहेत. यात्राकाळासाठी नगरपरीषदेकडून 22 स्वयंसेवकांची नियुक्ती होणार आहे. तसेच एनसीसीचीही मदत घेतली जाणार आहे. शहरातील सर्व रूटची तपासणी झाली आहे. आवश्यक त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे असे दंडवते म्हणाले.
गर्दीच्या वेळी अपप्रवृत्तींमुळे सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी cctv आणि लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. थिल्लरपणा करणारांवर पोलिस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नागपंचमी यात्रेचा मोठ्या प्रमाणात आनंद घ्यावा असे अवाहन मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी यावेळी बोलताना केले.