नागपंचमी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ : श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यामुळे जामखेड शहरातील वातावरण झाले भक्तीमय !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या जामखेड नागपंचमी यात्रोत्सवास प्रारंभ झाला. मंंगळवारी टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीनागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जामखेड शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे व श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवारी गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री.विठ्ठल महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वरची नागपंचमीच्या निमित्ताने यात्रा असते. गेल्या १९ वर्षांपासून श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.मंगळवारी सकाळपासूनच येथे मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. सकाळी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. महाआरती करून श्री नागेश्वराचा मुखवटा पालखीमध्ये ठेवण्यात आला.ही पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर हरहर महादेवाच्या व ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली.
खर्डा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर,जयहिंद चौक, कचेरी रस्ता, परिट गल्ली, महादेव गल्ली मार्गे पुन्हा खर्डा रस्त्याला आली आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्री नागेश्वर मंदिर येथे पोहोचला त्या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सांगता आरती करण्यात आली.
यावेेळी भजनी मंडळाचे पंढरीनाथ महाराज राजगुरू, सीताराम राळेभात, रावसाहेब कोल्हे , अश्रू कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे, दीपक महाराज गायकवाड, बाबा मुरुमकर, दादा आजबे, हरिदास गुंड, जगन्नाथ धर्माधिकारी, शंकर माळी, ईश्वर महाराज तौर, जगदीश महाराज आळंदीकर, ओम महाराज आळंदीकर , विष्णू म्हेत्रे, यांच्या समवेत विठ्ठल भजनी मंडळ,तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे दादासाहेब महाराज सातपुते व परिसरातील टाळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कलशधारी महिला, पताकाधारी तरूण मुले यांच्या सहभागामुळे दिंडीला शोभा आली.
दिंडी मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती.शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.एकूणच संपूर्ण जामखेड शहर आज भक्तीमय झाले होते. दुपारी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरांनी रुद्र याग व होम हवन केले.
संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख , संतोष बारगजे , मिलिंद ब्रम्हे, अशोक गिरमे ,अमोल लोहकरे ,दिलीपकुमार राजगुरू, विनायक राऊत प्रवीण राऊत, शंकर राऊत, आनंद राजगुरू, सचिन वराट ,सुधाकर हराळे,महादेव पानसांडे ,दत्ता राऊत, चंद्रकांत राऊत,राजेंद्र जाधव , अशोक निकम, किरण सोनवणे, सागर राळेभात, दादा म्हेत्रे, अनिल फरांडे, अण्णासाहेब भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.