जामखेड टाईम्स वृत्तसेवा: नगरपरिषदने थकीत कर वसुलीसाठी शहरात अनोखे अंदोलन केल्याने थकबाकीदार नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती.थकीत कर वसुलीसाठी नगरपरिषदेने मंगळवारी आक्रमक भूमिका घेत थकबाकीदारांच्या घरासमोर डफडे वाजवण्याचे अंदोलन केले. या अंदोलनाची दिवसभर शहरात जोरदार चर्चा रंगली होती.
थकबाकी भरण्यासंबंधी नगरपरिषदेने वेगवेगळ्या माध्यमांतून अवाहन केले होते. परंतु नागरिक दाद देत नव्हते. विशेषता: बड्या थकबाकीदारांचे डिजीटल बोर्डवर नावे झळकूनही थकबाकीदारांनी प्रतिसाद दिला नव्हता. परंतू थकबाकी वसुल करायचीच या इराद्याने मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी मंगळवारी भरसकाळी आपल्या पथकाला सोबत घेत बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन डफडे बजाओ अंदोलन केले. नगरपरिषदेच्या या अनोख्या मोहीमेमुळे थकबाकीदारांची भलतीच भंबेरी उडाल्याचे दिसून येत होते. नगरपरिषदेच्या या अनोख्या वसुली मोहीमेचा थकबाकीदारां धसका घेतला. नको तो इज्जतीचा पंचनामा अशी म्हणण्याची वेळ थकबाकीदारांवर येऊन ठेपली होती.
दिवसभरात नगरपरिषदेच्या डफडे बजाओ अंदोलनामुळे सुमारे 02 लाख 25 हजार 633 रूपयांची वसुली झाली. यामध्ये घरपट्टी -1 लाख 52 हजार 336 रूपये व पाणीपट्टी 73 हजार 297 रूपये वसुल करण्यात नगरपरिषदेच्या वसुली पथकाला यश आले