रोहित पवारांच्या बैठकीत जामखेडमधील अतिक्रमण हटावचा मुहूर्त टळला, तूर्तास लहान मोठ्या व्यावसायिकांना दिलासा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचे मोजणीचे काम चालू झाले आहे, या भागातील अतिक्रमणांवर कोणत्याही क्षणी हातोडा पडू शकतो अशी चर्चा शहरात रंगली होती. यामुळे या भागातील लहान मोठ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. दिवाळीपुर्वी अतिक्रमण हटविल्यास व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, हा धोका ओळखून अतिक्रमण हटाव मुहूर्त दिवाळी नंतर काढला जाणार आहे. यामुळे लहान मोठ्या व्यवसायिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास टाकला.
श्रीगोंदा ते बीड जिल्हा सरहद्द या भागातून NH548D हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. सदर महामार्ग जामखेड शहरातून जात असल्याने महामार्गाच्या कामात अडथळे ठरणारे अतिक्रमणे काढली जाणार आहेत.
जामखेड शहरातून जाणार्या या महामार्गाच्या 13.39 किमी लांबीच्या रस्त्याच्या मोजणीचे काम चालू झाले आहे. हा महामार्ग शहरातून जात असताना शहरातील छोट्या व्यवसायिकांसह काही इमारती बाधित होणार आहेत.
जामखेड शहरातून जाणार्या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसह इमारत मालकांची आज आमदार रोहित पवार यांनी जामखेडमध्ये बैठक घेतली. या बैठकीला महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पार पडलेल्या बैठकीत आमदार रोहित पावर यांनी 4 टप्यात अतिक्रमणावर चर्चा केली.
पहिल्या टप्यात बाफना मंदीर ते एसटीडेपो, दुसर्या टप्प्यात एसटी डेपो ते खर्डा चौक, तिसऱ्या टप्प्यात खर्डा चौक ते बीड रोड कॉर्नर व शेवटी शासकीय दूध केंद्र या दरम्यानच्या सर्वच दुतर्फा व्यवसायिकाशी चर्चा केली. त्यांच्यावर कमीत कमी स्वरूपाची कार्यवाही होईल अशी ग्वाही पवार यांनी दिली.
जामखेड शहरातून जाणाऱा राष्ट्रीय महामार्ग हा चौपदरी असणार आहे. मध्यभागी स्ट्रीट लाईट व दुतर्फा नाल्या, सुशोभीकरण असे असणार आहे. त्याचबरोबर खर्डा चौकात छत्रपतींचा पुतळा तसेच बीड कॉर्नर च्या परिसरात जैन स्तंभ उभा करण्याची इच्छा आमदार रोहित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली.
सदर महामार्गाची दिवाळीपर्यंत मोजणी पुर्ण करावी. त्यानंतर ज्यांच्या बांधकामावर गदा येणार आहे अश्याच व्यापाऱ्यांना व अधिकाऱ्यांना घेऊन, एक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे असे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सुचवले.
या बैठकीस राजेंद्र कोठारी, मधुकर आबा राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, सुरेश भोसले, वैजनाथ पोले, सुनिल जगताप, इरफान शेख, तसेच शहरातील छोटे मोठे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या.