रोहित पवारांनी फुंकले जामखेड नगरपरिषद निवडणुकीचे बिगूल 

230 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन : अजित पवारांसह आघाडीच्या मंत्र्यांची उपस्थिती 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | अगामी जामखेड नगरपरिषद ( jamkhed Municipal Council Election) निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी निवडणूक तयारी आता वेगवान केली आहे. त्याच अनुषंगाने जामखेड शहरात 230 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शनिवारी भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. (Bhumi Pujan of 230 crore development works: Presence of Ajit Pawar and other leading ministers)

महाविकास आघाडीतील पाच बड्या मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमांतून आमदार रोहित पवार हे जामखेड नगरपरिषदेच्या अगामी निवडणूकीचे बिगूल फुंकणार असल्याचे आता बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे विकास कामे ठप्प झाली होती. या काळात आमदार रोहित पवार यांनी विकास कामांचे योग्य नियोजन आखत वेगवेगळ्या योजनांचे अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनदरबारी दाखल केले होते. कोरोना महामारीनंतर सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत. शासनाकडून विविध विकास कामांना गती मिळू लागली आहे.

जाहिरात

नगरपरिषदेसाठी रोहित पवारांनी कसली कंबर

आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच जामखेड नगरपरिषद व कर्जत नगरपंचायतीच्या निवडणूका कोणत्याही क्षणी लागू शकतात. या निवडणुकीच्या तयारीला एक भाग म्हणून रोहित पवार यांनी कोट्यावधी रूपये खर्चाच्या विविध योजनांचे भूमिपूजन हाती घेतले आहे. या माध्यमांतून जनतेला आकर्षित करण्याची योजना आखली जात आहे. विकास कामांना गती मिळू लागल्याने आता जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

शनिवारी जामखेडमध्ये येणार महाविकास आघाडीचे मंत्री

राष्ट्रवादीचे युवा नेते तथा कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्जत- जामखेड मतदारसंघात विकास कामांचा मोठा धुमधडाका हाती घेण्यात आला आहे. जामखेडमध्ये सुमारे 230 कोटी रूपये खर्चून होणाऱ्या विविध विकामांच्या भूमीपूजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसुल राज्यमंत्री अब्दूल सत्तार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, दत्ता मामा भरणे हे पाच मंत्री उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम जामखेड शहरातील बाजारतळ परिसरात शनिवारी सकाळी 10 वाजता होणार आहे.

अशी आहेत 230 कोटींची विकास कामे

आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड शहर पाणी योजना (140 कोटी), जामखेड शहर अंतर्गत रस्ते (15 कोटी), व्यापारी संकुल (09 कोटी), शासकीय विश्रामगृह ( 04 कोटी 30 लाख) , बस स्थानक व्यापारी संकुल ( 07 कोटी 89 लाख) नाना नानी पार्क (02 कोटी) अमरधाम (02 कोटी), सार्वजनिक वाचनालय (01 कोटी 50 लाख ), तलाठी कार्यालय (08 कोटी 82 लाख), पंचायत समिती ( 03 कोटी 88 लाख) , पोलिस अधिकारी व कर्मचारी वसाहत ( 08 कोटी 89 लाख), पंचायत समिती पदाधिकारी व अधिकारी निवासस्थान (10 कोटी 91 लाख), महसुल अधिकारी व कर्मचारी निवास्थान (12 कोटी 06 लाख ) अश्या एकुण 230 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे.

जामखेड पाणी पुरवठा योजना ठरणार गेमचेंजर

जामखेड शहराचा पाणीप्रश्न कायम मिटावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी 140 कोटी रूपये खर्चाच्या नव्या पाणी योजनेस मंजुरी मिळवली. ही योजना दर्जेदार होऊन शहराचा पाणीप्रश्न कायम स्वरूपी सुटल्यास ही योजना अगामी काळात गेमचेंजर ठरेल अशी चर्चा आहे. मध्यंतरी जामखेड शहर पाणी योजनेवरून बरेच राजकारण तापले होते.भाजप विरूध्द राष्ट्रवादी हा संघर्ष उभा ठाकला होता. हा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत अधिक तीव्र होताना दिसणार आहे.