जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात भरदिवसा घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. कडभनवाडी (साकत) येथील येथील साकेश्वर महाराजांचा मुकुट चोरीस जाण्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील रत्नापुर येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल दीड लाखाच्या मुद्देमालावर डल्ला मारत पोबारा केला.
पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील मिना बाळासाहेब वारे ह्या दि १९ रोजी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. यानंतर त्यांचा एक मुलगा जामखेड या ठिकाणी कामासाठी तर दुसरा मुलगा घराला कुलूप लावून शेतात कामानिमित्त गेला होता.
वारे यांचे घर बंद असल्याचा फायदा उचलत अज्ञात चोरटय़ांनी बंद घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले रोख ८० हजार व काही सोने आसा एकुण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
फिर्यादी मिना बाळासाहेब वारे यांचा मुलगा घरी आला त्यावेळी त्याला घराचे दार उघडे असल्याचे दिसले. त्याने घरात जाऊन पाहिले असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जामखेड पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.