जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व कीटकशास्त्र विभागांतर्गत शेतकऱ्यांमध्ये फायदेशीर कीटकांबाबत जागृती करण्यात आली. हा कार्यक्रम मोहा येथे पार पडला.
मधमाशी, लाख किडा, रेशीम किडा , ट्रायकोग्रामा, क्रायसोपर्ला, लेडी बर्ड बीटल आदी कीटकांचे महत्व सांगण्यात आले. ट्रायकोग्रामा हा अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी येणारा कीटक आहे, तसेच मधमाशी, लाख किडा, रेशीम किडा यांच्या संगोपनाबाबत शास्त्रीय माहिती पुरवण्यात आली. या फायदेशीर कीटकांमुळे कीड़ नियंत्रणात राहते व रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करता येतो, तसेच झायगोग्रामा बायकोलोरेटा या मित्रकीटकाद्वारे गाजर गवतावर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे. अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
या प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषिदूत अशरफअली शेख, चंद्रशेखर वाले, किरण दाताळ, सौरभ बोरकर, ओंकार दौंड, विकास जाधव व संविधान वानखेडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय सोनवणे , कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश लांडे व विषय विशेषतज्ञ डॉ. नजीर तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी मोठ्या संख्येमध्ये शेतकरी उपस्थित होते.