संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेची जामखेडमध्ये जय्यत तयारी, अशी असेल पार्किंग व्यवस्था, हजारो मराठा बांधवांनी महासभेस उपस्थित रहावे – मराठा क्रांती मोर्चाचे अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून ऐतिहासिक लढा उभारणारे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौर्यावर आहेत. येत्या 6 ऑक्टोबर 2023 रोजी मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांशी संवाद साधण्यासाठी जामखेड तालुक्यात येणार आहेत. जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या यशस्वीतेसाठी जामखेडच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जय्यत तयारी हाती घेण्यात आली आहे. या सभेला जामखेड तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, त्यादृष्टीने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तगडे नियोजन हाती घेण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांची 6 ऑक्टोबर रोजी जामखेडमध्ये जंगी महासभा होणार आहे. या सभेच्या नियोजनासाठी आज 4 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक साई गार्डन येथे पार पडली. जरांगे पाटील यांची महासभा यशस्वी करण्यासाठी जामखेड तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित रहावे, असे अवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे दि ६ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खर्डा मार्गे जामखेडकडे येणार आहेत. त्यामुळे खर्डा येथील मराठा बांधवांच्या वतीने त्यांचे खर्डा बस स्थानक परिसरात सहा जेसीबींच्या माध्यमातून फुलांची उधळण करत व मोठा हार घालून सत्कार करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी स्वागत झाल्यावर ते जामखेडकडे रवाना होणार आहेत. मात्र सभेपूर्वी जरांगे पाटील हे चौंडी येथे जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिस्तंभाचे दर्शन घेऊन पुन्हा जामखेडकडे सभास्थळी येणार आहेत.
4 ऑक्टोबर रोजी साई गार्डन येथे मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महासभेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात दाखल होणाऱ्या सर्व रस्त्यांवर कोणत्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था राबवायची याबाबत चर्चा करण्यात आली.
अशी असेल पार्किंग व्यवस्था
त्यानुसार पार्किंग स्पाॅट निश्चित करण्यात आले. त्यानुसार खर्डा, नान्नज व जवळा भागातून येणाऱ्या बांधवांसाठी लक्ष्मी चौक येथुन नवीन नगरपरिषद रोडने मोरे वस्ती समोरील प्लॉटींग मध्ये वहाने पार्किंग करावीत. बीड रोडने येणारी वाहने कृषी उत्पन्न बाजार समिती व मराठी शाळेच्या पाठीमागील आवारात तर नगररोड ने येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पन्हाळकर हॉस्पिटल मार्गे जुन्या गोडाऊनच्या ग्राऊंड मध्ये करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात असे होणार स्वागत
मनोज जरांगे पाटील यांचे जामखेड शहरात दुपारी 3 वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील यांच्यावर ठिक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. सभास्थळी आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिजाऊ वंदना होईल. तालुक्यातील लहान मुलींच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होईल. येणाऱ्या सर्व मराठा बांधवांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय शहरातील डॉ सुशिल पन्हाळकर यांच्या तर्फे करण्यात आली आहे. या कार्यक्रमास दोन्ही आमदार व खासदार आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.