जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दुकानासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून जामखेड शहरात तरूणास मारहाण करण्याची घटना घडली. या घटनेत 7 तोळे वजनाची सोन्याची चैन काढून घेत तरूणास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जामखेड पोलिसांत व्यापारी कुटूंबातील चौघांसह अन्य तीन अश्या सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली.
याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला भरत जगदाळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. 23/10/2022 रोजी रात्री 8/30 वा. सुमारास मी चहा पिण्यासाठी शितल भांड्याचे दुकानासमोर गाडी लावून रोडच्या पलीकडे असणारे चहाचे टपरीवर चहा पिण्यास गेलो असताना उमाकांत अंदूरे, सागर उमाकांत अंदूरे, शशिकांत अंदूरे, आदित्य शशिकांत अंदूरे व इतर अनोळखी तीन जण सर्व रा. जामखेड ता. जामखेड हे आले. मला म्हणाले की, तुला मागील वेळेस सांगितले होते की, आमचे दुकानासमोर गाडी लावू नको तुला एकदा सांगितलेले ऐकू येत नाही काय. तु लई माजलास का असे म्हणून त्यांनी मला घाण घाण शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व हातात विटा धरून मारहाण केली.
त्यावेळी उमाकांत अंदूरे यांनी त्यांचे हातातील लोखंडी गजाने माझे पायावर व छातीवर मारहाण करून माझे गळ्यातील ७ तोळा वजनाची सोन्याची चैन काढून घेवून मला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. व सागर उमाकांत अंदूरे शशिकांत अंदूरे, आदित्य शशिकांत अंदूर व इतर अनोळखी तीन जणांनी लाथाबुक्यांनी मला मारहाण करून याचा माज जिरवून टाकू असे म्हणत होते तसेच ते मला म्हणाले की, तु जर परत आमचे दुकानासमोर गाडी लावली तर तुला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिली.
त्यावेळी आमचे भांडणे सोडविण्यास माझे मित्र – सागर डिसले व अमोल आजबे हे आले त्यांना ही वरील लोकांनी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच म्हणाले की, आमच्या नादी लागू नका. आमचेकडे पाच दुकाने असून आमचेकडे पैसेही भरपूर आहे. झालेल्या भांडणात मी डॉ. खराडे यांचेकडे जावून औषधोपचार घेतला असे फिर्यादीत म्हटले आहे.
भरत जगदाळे यांनी जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून उमाकांत अंदूरे, सागर उमाकांत अंटूरे, शशिकांत अंदूरे, आदित्य शशिकांत अंदूरे व इतर तीन अनोळखी अश्या सात जणांविरोधात कलम 327, 504, 504, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.