जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था तसेच अहमदनगर जिल्हा आरोग्य विभाग यांच्या सहकार्यातून पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन कर्जत जामखेड मतदारसंघातील नागरिकांसाठी करण्यात आले होते. दिनांक 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान हे शिबिर आयोजित केले होते. सदरील शिबिराला कर्जत जामखेड मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून 14 ते 23 डिसेंबर दरम्यान तब्बल 51 हजार 467 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन एक उच्चांक निर्माण केला आहे.
डोळे तपासणी शिबिरासाठी एच.व्ही देसाई रुग्णालय तसेच भारती हॉस्पिटल, पुणे येथील निष्णात डॉक्टरांची तुकडी कार्यरत होती. तसेच आरोग्य शिबिरासाठी देवयानी हॉस्पिटल, कोथरूड, पुणे, योगेश्वरी हॉस्पिटल, दौंड. श्री. मयूरेश्वर हॉस्पिटल, केडगाव गिरीराज हॉस्पिटल, बारामती, बारामती हॉस्पिटल बारामती, निरामय हॉस्पिटल, बारामती या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले होते. त्यानुसार नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने हे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडले. तसेच राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ आपापल्या गावांमध्ये घेतला आहे.
आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना असे सांगितले की, कोरोनामुळे आम्हाला बाहेर गावी रुग्णालयात जाण्याची भीती वाटत होती. पण आपल्या गावातच अगदी मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाल्याने त्याचा सर्वार्थाने फायदाच झाला तसेच तपासणीसह मोफत औषधेही जागेवरच प्राप्त झाले. त्याच बरोबर अनेकांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार होते पण त्याचं निदान झालेलं नव्हतं. पण या शिबिरामार्फत त्यांच्या आजाराचे निदान तर झालेच शिवाय त्यांना सुयोग्य वैद्यकीय मार्गदर्शनही मिळाले.
ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक आरोग्य सुविधा किंवा वैद्यकीय चाचण्याबाबत पुरेशी माहिती नसते. पण या शिबिरामुळे महिलांनाही त्यांच्या अडचणींबाबत माहिती मिळाली व त्यांनी यावेळी बोलत असताना समाधान व्यक्त केले. तसेच वंध्यत्व असणाऱ्या परिवाराला मोफत समुपदेशन मिळालं. तसेच अशा वंधत्व निवारण गोष्टी नाममात्र दरात उपलब्ध असतात हे देखील अनेक परिवारांना माहिती नव्हतं पण कर्जत जामखेडमध्ये आयोजित केलेल्या या मोफत आरोग्य शिबिरामुळे त्याचा फायदा सर्व नागरिकांना झाला. तसेच वयोवृद्ध नागरिकांनी या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला कारण त्यांना त्यांच्या गावातच सर्व चाचण्या आणि औषधे मिळण्याची सोय या शिबिरामुळे निर्माण झाली होती.
पुण्यातील नामवंत रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत डोळ्यांची तपासणी करून घेतली तसेच जागेवरच त्यांना योग्य ते मार्गदर्शन व चष्मे देखील वाटप करण्यात आले. हा नागरिकांसाठी एक सुखद धक्का होता की पहिल्यांदाच सर्व काही आपल्या दारात उपलब्ध झालं होतं. त्याचबरोबर ज्या नागरिकांच्या शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते त्यांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी देखील सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे.