जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने “माँ साहेब जिजाऊ” यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्जत नगरपंचायतीच्या कर व प्रशासक अधिकारी शीला जोशी, अभियंता रुपाली भालेराव यांच्यासह जिजाऊ लेकीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात “राजमाता जिजाऊ” यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
दि १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती. सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने शहरात जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माँ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पुजन जिजाऊ लेकीच्या हस्ते पार पडले. यानंतर राजकन्या नवले आणि शिवकन्या नवले यांनी जिजाऊ वंदना गायले.
कोरोनाचे वाढते सावट पाहता सकल मराठा समाज कर्जतच्यावतीने जिजाऊ जन्मोत्सव निम्मित ऑनलाइन वेशभूषा, पेहराव यासह दोन मिनिटं कालावधीत व्हिडीओ संदेश स्पर्धा घेण्यात आली. ऑनलाइन स्पर्धेसाठी बक्षीस जाहीर करणाऱ्या सुधीर यादव, अनुज कुलथे, नितिन देशमुख, ओंकार काकडे, प्रसाद कानगुडे, प्रमोद पाडुले यांचा पुस्तके देत सन्मान करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे तालुका प्रमुख समन्वयक धनंजय लाढाणे व सर्व मराठासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्जत शहर आणि तालुक्यात राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा
कर्जत शहर यासह तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा- महाविद्यालय आणि सर्व शासकीय विभागात माँ साहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक जिजाऊ लेकी “माँ साहेब जिजाऊ” यांच्या वेशभूषेत लक्ष वेधत होते. अनेक विद्यार्थिनीनी राजमाता जिजाऊ यांचा इतिहास आपल्या भाषणात सांगितला.