Chamoli Accident : ‘नमामी गंगे’ प्रकल्पात भीषण दुर्घटना, सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील ट्रान्सफाॅर्मरचा वीज प्रवाह उतरल्याने 16 जणांचा मृत्यू !
दिल्ली (वृत्तसंस्था) : अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या नमामी गंगे शुध्दीकरण प्रकल्पाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ट्रान्सफाॅर्मरचा वीज प्रवाह उतरल्याने 16 जणांचा मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत गृहरक्षक दलाच्या तीन जवानांसह एका पोलिसाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ऋषीकेशच्या एम्स रूग्णालयात उपचार सुरु आहेत. (Chamoli transformer news)
उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या नमामी गंगे शुध्दीकरण प्रकल्पाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मंगळवारी रात्री एका व्यक्तीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या घटनेचा बुधवारी पंचनामा सुरू होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या संरक्षक कठडयांमध्ये वीजप्रवाह उतरण्याची पुन्हा घटना घडली. वीजेचा धक्का इतका तीव्र होता की, यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे काही नातलगही बुधवारच्या घटनेत दगावले आहेत मृतांमध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रावत आणि तीन गृहरक्षक दल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती चमोलीचे पोलीस अधीक्षक प्रमेंद्र डोबाल यांनी दिली.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) व्ही. मुरुगेशन यांनी मंगळवारी एक व बुधवारी १५ अश्या १६ जणांच्या मृत्यूच्या वृत्तास दुजोरा दिला. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, काही जणांना हेलिकॉप्टरद्वारे ऋषिकेशच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) हलवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातलगांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत धामी यांनी जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांकडून दूरध्वनी करून या दुर्घटनेची माहिती घेतली.
सखोल चौकशीचे आदेश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी ‘नमामी गंगे’ प्रकल्पातील दुर्घटनेच्या दंडाधिकारीस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दुर्घटनेत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चमोलीचे जिल्हाधिकारी हिमांशू खुराणा यांनी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी डॉ. अभिषेक त्रिपाठी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून, त्यांना एका आठवडय़ात सविस्तर तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताची कारणे आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना व सूचनांचा समावेश अहवालात करण्यास सांगितले आहे.