Today Five Big News Stories | राज्यात 24 लाख बोगस विद्यार्थी ते आर्यन खानचा जेल मुक्काम का वाढला ? यासह वाचा एका क्लिकवर दिवसभरातील पाच मोठ्या बातम्या !
औरंगाबाद : Today Five Big News Stories। राज्यात 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी जनहित याचिका औरंगाबाद Aurangabad High Court PIL) खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आधारकार्डशी (AadharCard) जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.बीड जिल्ह्यातील ब्रिजमोहन मिश्रा (Brijmohan Mishra, Beed) यांनी ही याचिका दाखल केली आहे.
राज्यात गाजलेल्या बोगस पटपडताळणी प्रकरणानंतर 3 जुलै 2015 रोजी राज्य शासनाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरळ प्रणालीचा वापर केला. त्यात, शाळेतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी आधार कार्डद्वारे करण्यात आली. बोगस विद्यार्थी संख्येला आळा बसेल असा त्यामागील उद्देश होता. परंतु खासगी शाळा, मुख्याध्यापक, संस्था संचालक, भ्रष्ट अधिकारी यांच्या संगनमताने राज्यभरात अंदाजे 24 लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या प्रकरणी कारवाई न करता अतिरिक्त मुख्य सचिवांनी तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यावर याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील दोषींविरोधात फौजदारी कारवाई करावी आणि दंड लावावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
याचिकेत करण्यात आलेल्या दाव्यानुसार बीड जिल्ह्यात 16,061 विद्यार्थी, नांदेड जिल्ह्यात 45,000 हजार विद्यार्थी, परभणीमध्ये 15 हजार तर लातूरमध्ये 15000 विद्यार्थी संख्या बोगस असल्याचा दावा करण्यात आला आहे.
2) एका फोटोमुळे आर्यनचा जेल मुक्काम वाढला
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan, son of Bollywood actor Shah Rukh Khan) गुरुवारी (28 ऑक्टोबर) हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला. हायकोर्टाकडून आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजेच आज शुक्रवारी त्याची जेलमधून सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती.पण काही कारणास्तव आर्यनची आज जेलमधून सुटका होऊ शकली नाही. आर्यनची जेलमधून सुटका न होण्यामागील नेमकं कारण आता समोर आलं आहे.
आर्यनच्या जामीनासाठी अभिनेत्री जुही चावला (Actress Juhi Chawla) जामीनदार म्हणून सेशन कोर्टात संध्याकाळी जवळपास साडेचार वाजेच्या सुमारास दाखल झाल्या होत्या. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे (Lawyer Satish Maneshinde) देखील कोर्टात आले होते. त्यांनी कोर्टात न्यायाधीशांकडे जामीनाचे कागदपत्रे सादर केले. तसेच जुही चावला जामीनदार (Guarantor) म्हणून कोर्टात हजर झाली. यावेळी कोर्टात जुहीचं आधारकार्ड आणि पासपोर्ट सादर करण्यात आलं. जुहीने औपचारिकपणे आपला परिचय कोर्टात दिला. पण जुहीचा एक पासपोर्ट फोटो कमी पडल्याने जामीनाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास उशिर झाला.
नियमानुसार जामीनासाठी जामीनदाराचे दोन फोटो जरुरीचे असतात. पण दोन फोटो नसल्याने या प्रक्रियेला उशिर झाला. यावेळी कोर्टाने वकिलांना फटकारले. जामीनाची सर्व प्रक्रिया माहिती असताना जामीनदारांना त्याबाबत आधी माहिती देणं अपेक्षित होतं, असं न्यायाधीशांनी वकिलांना सुनावलं. त्यानंतर जुहीचे आणखी एक पासपोर्ट साईज फोटो मागविण्यात आला.
दुसरीकडे आर्यनची जेलमधून सुटका व्हावी यासाठी ऑर्थर रोड जेलबाहेर (Arthur Road Prison) असलेल्या जामीन पत्रपेटीत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जामीनाचे सर्व कायदेशीर कागदपत्रे पोहोचणे अपेक्षित होतं. ही पेटी संध्याकाळी साडेपाचपर्यंत बंद होते. पण साडेपाच वाजेपर्यंत सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडू शकली नाही. या कायदेशीर प्रक्रियेला उशिर झाल्याने त्याचे कागदपत्रे जेलबाहेरील जामीन पत्रपेटीत पोहोचू शकले नाही. त्यामुळे आर्यनचा जेलमधील मुक्काम आणखी एका रात्रीने वाढला. (Aryan’s stay in jail was extended by another night)
3) मेव्हण्याने काढला दाजीचा काटा
बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा मेव्हण्याने काटा काढला. बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून चिडून वाखाण परिसरात राहत असलेल्या मजूराचा त्याच्याच मेव्हण्याने गळा दाबून तसेच दगडाने ठेचून खून केला.गुरुवार दि. 28 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.नितीन नागेश भालशंकर (रा. वाखान परिसर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर रवी रमेश कुडवे (रा. वाखाण परिसर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे खून प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.
4) ऊर्जामंत्री नितीन राऊतांची मोठी घोषणा : राज्य वीज मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड
मुंबई: राज्य वीज मंडळाच्या तीन कंपन्या निर्मिती, पारेषण आणि वितरणच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनुक्रमे ७५०० आणि १२५०० रूपये दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान (Bonus To Electricity Department) देण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr Nitin Raut Declared Bonus For Electricity Department Employees) यांनी चित्रफितीव्दारे माहिती देत जाहीर केला आहे.
यामध्ये डॉ राऊत यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाच्या संसर्गासह अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांमुळे महामंडळाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यासोबतच सध्या कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीमध्ये अडचणी येत आहेत. त्या बरोबरच मोठ्या प्रमाणत थकीत देयकांच्या प्रश्नामुळे महामंडळे संकटात आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोरोनासह अन्य सर्व आपत्तीमध्येही महामंडळाच्या तीनही कंपन्यांचे वर्ग १ ते चार पर्यंतचे कर्मचारी आणि अधिकारी सातत्याने कार्यरत असून त्यांनी वर्षभर अविश्रात सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या दिवाळीत त्यांना अनंद मिळावा यासाठी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5) राज्यातील सर्व साखर कामगारांची दिवाळी झाली गोड
महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार करण्यात होता. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक १ एप्रिल २०१९ व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या करारानुसार आता या कामगारांना अस्तित्वात असलेल्या मूळ पगार, महागाई भत्ता, स्थिर भत्ता मिळून १२ टक्के पगारवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व साखर कामगारांची दिवाळी गोड झाली असल्याची भावना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयान्वये दिनांक १ एप्रिल २०१९ रोजी संबंधित कामगारांच्या वेतनश्रेणीत १२ टक्के पगारवाढ म्हणजे अस्तिवात असलेल्या पगाराच्या १२ टक्के देण्यात येणार आहे. या शिवाय फिटमेंट बेनिफिट देण्यात येणार आहे. तृतीय वेतन मंडळाने सूचविलेली वर्गवारी व वेतनश्रेणी आणि स्थिर भत्ता यापूर्वी स्वीकारण्यात आले आहे. त्यात स्थिर भत्ता पूर्ण रूपयात करून घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम-१९८३ अन्वये घरभाडे भत्ता प्रदान करण्यात येणार आहे. तथापि, जे कामगार / कर्मचारी कारखान्यामार्फत दिलेल्या घरात राहतात, त्याला घरभाडे भत्ता देय नसणार आहे.
उपरोक्त शासन निर्णयानुसार दिनांक १ एप्रिल २०१९ पासून रात्रपाळीत (तिसरी पाळी) काम करणाऱ्यांना/हजर असलेल्या प्रत्येक रात्रीपाळीसाठी २६ रूपये प्रमाणे रात्रपाळी भत्ता प्रचलित पद्धतीनुसार लागू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामगारांना ग्रेडप्रमाणे दरमहा धुलाई भत्ता आणि दरमहा ३०८ रूपये वैद्यकीय भत्ता देय करण्यात आला आहे. स्त्री कामगारांना मॅटर्निटी बेनिफिट अधिनियमानुसार रजा देय करण्यात आली असून अनुकंपा धोरण लागू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे रजा व पगार सुट्ट्या, गणवेश वाटप, प्रवासभत्ता, वाहनभत्ता, दैनिक भत्ता, ग्रुप ग्रॅच्युईटी विमा योजना, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, कारखान्याच्या विश्रामगृह सवलती आदी लागू करण्यात आला आहे.
उपरोक्त शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202110291551231310 असा आहे. या शासन निर्णयाने कामगारांचे हित जपले असून सर्व कामगार आणि कारखान्यामधील कर्मचाऱ्यांना एक आत्मविश्वासाची भावना निर्माण होणार असल्याचे कामगार मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.