महाराष्ट्राचे टेन्शन वाढले : शनिवारी आढळले 41 हजार 434 नवे कोरोनाबाधित, दोन दिवसात सापडले 80 हजार रुग्ण, 41 thousand 434 new corona patients found in Maharashtra on Saturday
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 8 जानेवारी । राज्यात कोरोनाचा मोठा उद्रेक सुरू आहे. शनिवारी तर कोरोनाचा मोठा विस्फोट झाला. तब्बल 41 हजार 434 नवे रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसातील रुग्ण वाढ 80 हजाराच्या घरात गेल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील सक्रीय रूग्णांचा आकडा आता दोन लाखांच्या जवळ पोहचला आहे. (41 Thousand 434 New Corona Patients Found In Maharashtra On Saturday)
महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना रूग्ण संख्येत मोठी सुरू आहे. 31 डिसेंबर पासून कोरोना दुपटीने वाढू लागला आहे. राज्यात शुक्रवारनंतर शनिवारी कोरोनाचा महाउद्रेक झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात एकुण 40 हजार 925 नवे रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर शनिवारी 41 हजार 434 रूग्ण आढळून आले. दोन दिवसांत 80 हजार रूग्ण संख्या वाढल्याने राज्याच्या चिंता वाढल्या आहेत.
13 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात शनिवारी 09 हजार 671 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 13 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 1 लाख 73 हजार 238 इतकी झाली आहे.
ओमिक्रॉनने दिला पुण्याला मोठा तडाखा
राज्यात शनिवारी ओमिक्रॉनचे 133 रूग्ण आढळून आले. ओमिक्रॉनने शनिवारी पुण्याला मोठा तडाखा दिला. राज्यात शनिवारी आढळून आलेल्या नव्या ओमिक्रॉन रूग्णांमध्ये पुणे मनपा 118, पिंपरी-चिंचवड 08, पुणे ग्रामीण 03, वसई विरार 02, अहमदनगर 1, मुंबई 1 असे 133 रूग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजवर 1 हजार 9 ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 439 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. राज्यात सक्रीय ओमिक्रॉन बाधितांची संख्या 570 इतकी आहे. देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात शुक्रवार अखेर 08 लाख 45 हजार 89 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1851 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.37 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.5 टक्के आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने गियर बदलला
अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना रूग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात आज 225 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर 34 कोरोनाबाधितांना घरी सोडून देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील सक्रीय रूग्णांची संख्या 851इतकी झाली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून रूग्ण वाढ सुरू झाली आहे.
आठ दिवसांपासून कोरोनाचा वेग दुप्पट
राज्यात 31 डिसेंबरपासून कोरोनाने मोठा वेग पकडला आहे. रोज दुपटीहून अधिक रूग्ण आढळून येत आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रूग्ण मुंबई परिसरात आहेत. त्याखालोखाल ठाणे, पुणे, नागपूर, पालघर, रायगड, नाशिक मध्ये रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
राज्यातील मागील आठ दिवसातील आकडेवारी
31 डिसेंबर 2021 | 8067 रूग्ण |
---|---|
1 जानेवारी 2022 | 9,170 रूग्ण |
2 जानेवारी 2022 | 11, 877 रूग्ण |
3 जानेवारी 2022 | 12, 160 रूग्ण |
4 जानेवारी 2022 | 18, 466 रूग्ण |
5 जानेवारी 2022 | 26, 538 रूग्ण |
6 जानवारी 2022 | 36,265 रूग्ण |
7 जानवारी 2022 | 40 हजार 925 |