Prakhar Chaturvedi : नादच खुळा.. ४६ चौकार व ३ षटकार आणि ४०४ धावा, कर्नाटकच्या प्रखर चतुर्वेदीने मोडला युवराज सिंगचा २४ वर्षांपुर्वीचा विक्रम !
Prakhar Chaturvedi latest News : क्रिकेट हा तमाम भारतीयांचा आवडता खेळ आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी भारतातील अनेक तरूण रोज मैदानात घाम गाळतात. सर्वाधिक प्रतिभावान खेळाडूंची भूमी म्हणून भारताला ओळखले. क्रिकेटच्या मैदानावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाल्यावर विक्रमांना गवसणी घालणारे अनेक खेळाडू भारतात निर्माण झाले आहेत. अश्याच एका प्रतिभावान खेळाडूने एकाच डावात तब्बल ४६ चौकार व ३ षटकारांनी आतिषबाजी करत युवराज सिंगचा २४ वर्षापुर्वीचा विक्रम मोडण्याचा भीम पराक्रम करून दाखवला आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमी अजिबात नाही… आजच्या घडीला टीम इंडियाचे ३ वेगवेगळे संघ एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतील, असे तगडे खेळाडू BCCI कडे आहे. त्यात युवा संघातही चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या प्रखर चतुर्वदीने ( Prakhar Chaturvedi) कूच बिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये (१९ वर्षांखालील) नाबाद ४०४ धावांची खेळी करून इतिहास रचला. मुंबईच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करताना प्रखरने इतिहास रचला. कूच बिहार स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०० धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे.
मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. आयुष म्हात्रे व आयुष वर्तक यांच्या फटकेबाजी जोरावर मुंबईने ३८० धावांपर्यंत मजल मारली. म्हात्रेने १८० चेंडूंत १७ चौकार व ३ षटकारांसह १४५ धावा केल्या, तर वर्तकनेही ९८ चेंडूंत ७३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर प्रतिक यादवच्या ३० धावांनी हातभार लावला. कर्नाटकच्या हार्दिक राजने सर्वाधिक ४ बळी टिपले. सर्मथ एन व राहुल द्रविडचा मुलगा समित यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
कर्नाटकने यानंतर धावांचा पाऊस पाडला. सलामीवीर प्रखर व कार्तिक यांनी १०९ धावांची सलामी दिली. कार्तिक ६७ चेंडूंत ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रखर व हर्षिल धर्मानी यांनी चांगली फटकेबाजी केली. दोघांनी २९० धावांची भागीदारी केली. हर्षिल २२८ चेंडूंत १६९ धावांवर बाद झाला. कार्तिकेय ( ७२) व समित ( २२) व हार्दिक राज ( ५१) यांनी चांगला खेळ केला. एका बाजूने प्रखरने फटकेबाजी सुरू करून ६३८ चेंडूंत नाबाद ४०४ धावा केल्या. त्यात त्याने ४६ चौकार व ३ षटकारांनी २०२ धावा कुटल्या. कर्नाटकने ८ बाद ८९० धावांवर डाव घोषित केला.
प्रखरने आज युवराज सिंग याने २४ वर्षांपूर्वी या स्पर्धेच्या फायनलमध्ये केलेला ३५८ धावांचा विक्रम मोडला. या स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीत प्रखरची खेळी दुसऱ्या क्रमांकावर येते. महाराष्ट्राच्या विजय झोलने २०११-१२ मध्ये आसामविरुद्ध ४५१ धावा चोपल्या होत्या. प्रखर चतुर्वेदी (Prakhar Chaturvedi) या खेळाडूने केलेल्या ४०४ धावांच्या खेळीची चर्चा आता देशभर सुरु झाली आहे. विशेषता: बीसीसीआयने प्रखरच्या खेळीचे कौतुक केले आहे. बीसीसीआयने याबाबत एक्स या सोशल मीडियावर प्रखरच्या खेळीची माहिती सार्वजनिक केली आहे.
Prakhar Chaturvedi : कोण आहे प्रखर चतुर्वेदी ?
प्रखर चतुर्वेदी हा कर्नाटक संघाकडून खेळणारा युवा क्रिकेट खेळाडू आहे. कुच बिहार स्पर्धेच्या फायनल स्पर्धेत त्याने मुंबई विरूध्द ४०४ धावांची खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधले. बीसीसीआयने त्याच्या खेळीचे कौतूक केले आहे.